आज सहजच ती खिडकीपाशी आली. चंद्राकडे पाहत कुठे तरी हरवून गेली. अचानक भानावर आली, नजर इकडे तिकडे फिरवली. गजबजलेल्या शहरात तिला आज अनेक दिवसांनी शांतता गवसली.., नाही ! शहर मुळीच शांत नव्हते. त्या शहरातला कानेर फक्त तिला जाणवत नव्हता. एरवी जरा जरी आवाज झाला तरी तिची चिडचिड होई. मुंबई सारख्या भल्या मोठ्या शहरात, एका लहानश्या कुटुंबात काव्या श्वास घेत होती. तिच्या देखत त्या शहरात जिवंतपणा उरला नव्हता. सूर्याचं आगमन होतं नाही की, शहर उठू लागतं, सूर्य निघून चंद्र आला तरी या शहरात राहणाऱ्या माणसांचं राबणं थांबत नाही. नाना प्रकारची वाहनं, माणसं, त्यांचा तो आवाज, गडबड, गोंधळ ह्या सगळ्याच गोष्टी तिला रसहीन वाटत होत्या.
दूरध्वनी वाजला, पाहिलं तर कंपनीने संपर्क साधला होता. काव्याला हल्ली तो मोबाईल ही फारसा रोचक वाटत नसे. काय तेच तेच पाहायचं आणि ती व्हाट्सएप, फेसबुक..., तिला सगळंच कंटाळवाणं वाटतं असे. आज तरी ही तिने इन्स्टाग्राम उघडून पहिला, तिथे कोणीतरी नवीन च फोटो पोस्ट केला होता, ते पाहूनच तिने इन्स्टाग्राम बंद केलं अन् तो दूरध्वनी बंद करणार इतक्यातच तिला व्हाट्सएपवर कोणाचा तरी संदेश आला, तिने पाहिलं तर तिच्या महाविद्यालयातल्या मैत्रिणीच्या व्हाट्सएप गटावर कोणी तरी संदेश टाकला होता. तिने तो संदेश पाहून काहीच प्रतिउत्तर न देता स्टेटस् पाहिले तर केवढे ते स्टेटस् एकाच वेळी टाकलेले, तिने ते न पाहताच दूरध्वनी बंद करून तो टेबलवर ठेवला. तेवढ्यात घरात काही संवाद कानावर पडले, घरात सगळ्यांनीच अजाणतेपणी घेतलेली मौन राहण्याची शपथ तुटतेय की काय..? ह्या विचाराने तिने बाहेर येऊन पाहिलं तर तिची आई मोठ्या आवाजात काही तरी बोलत होती आणि तिचे बाबा ही त्याच आवाजात तिच्या आईला उत्तर देत होते. त्यांच्या घरी सहसा असेच संभाषण होत असे पौर्णिमा-अमावस्येला, ते ही गडगडाट झाल्यासारखं, कधी कधी तर विजा ही चमकतात. काव्या त्याच पावलांनी परत आली आणि पुन्हा चंद्राकडे पाहू लागली आता तर अनेकांना प्रेमात पडणारा चंद्र ही तिला निस्तेज वाटत होता. त्या लुकलुकणाऱ्या चांदण्या, ते तारे..., सगळेच त्या शहरांतल्या रस्त्यांवर असणाऱ्या सिग्नलच्या दिव्यांप्रमाणे तिला वैतागवाणे वाटत होते. तिने हलकाच सुस्कार सोडला आणि हळुवार डोळे मिटले. तिच्या काळ्याभोर डोळ्यातून, गालावर अलगद पाण्याचा थेंब पडला आणि परत एकदा तिला श्वास घेणं जीवावर आलं.
काव्या येऊन पलंगावर बसली. एक पेन हातात घेऊन कोऱ्या कागदावर काही अक्षरं टिपू लागली...,
इथेच खोल दडले, गूढ माझ्या मौनाचे
का शोधताय तुम्ही या कोऱ्या कागदावर
जिथे फक्त उमटलीत भावनाहीन चार अक्षरे..!
- ©आदिती जाधव.
#मराठी #मराठीसाहित्य #गूढ #अनुदिनी #शहर #मुंबई
very well written. could feel all the emotions while reading. I wish Kavya finds a safe haven, a happy place
उत्तर द्याहटवा