शनिवार, २८ ऑगस्ट, २०२१

कुमारीकेची सौभाग्यवती होताना...

आज आडिवलेकरांच्या घरी पाहुण्यांची गर्दी जमली होती. घरभर खमंग वास सुटला होता. घरासमोर मोठा मंडप उभारला होता. सगळीकडे आनंदाचा बहर आला होता; का नाही येणार म्हणा.., दोन दिवसांनी आडिवलेकरांच्या लाडक्या लेकीचा म्हणजेच रेवती चा लग्नसोहळा पार पडणार होता. तसं काही कारणास्तव रेवती च लग्न खूप घाई गडबडीत ठरलं पण; मुलाकडची मंडळी ही आडिवलेकरांच्या, मित्राच्या नात्यातले होते, त्यामुळे आडिवलेकर साहेबांना जास्त काळजी वाटत नव्हती, शिवाय त्यांनी सगळी शहानिशा करून चं लग्नाला होकार दिला होता. सगळीकडे लगीनघाई सुरू होती. पण! रेवती मात्र काळजीत दिसत होती. "रेवती, रेवती.., अगं कुठे आहेस ? " रेवती ची काकी तिला शोधत तिच्या खोलीत आली. पाहते तर काय सगळीकडे पसारा होता आणि रेवती मात्र एका कोपऱ्यात शांत बसली होती. 
      'रेवती' ही आडिवलेकर घराण्यातली एकुलती कन्या ! तिला एक सख्खा मोठा भाऊ आणि दोन चुलत भाऊ होते, त्यामुळे घरात सगळ्यांचाच तिच्यावर खूप च जीव . रेवती ही सगळ्यांना मायेने जपत होती, तिचा, तिच्या काकी - काका वर खूप जीव होता. तिची तिच्या काकी सोबत पक्की आणि अतूट मैत्री झाली होती. रेवतीची काकी तिच्या खोलीत आली, रेवती ला काकी ने दोन - तीन वेळा हाक मारली पण तीच लक्ष च नव्हतं. काकी ने रेवतीच्या डोक्यावरून मायेने हाथ फिरवला आणि " काय झालं " असं विचारलं, काकी चा स्पर्श होताच रेवती भानावर आली आणि, "काही नाही काकी.., सहजच विचार करत होती." असं बोलू लागली, हे ऐकताच काकी हसू लागल्या आणि रेवतीच्या बाजूला बसल्या. रेवती काकी च्या मांडीवर डोकं ठेऊन रडू लागली. काकीं नी तिला धीर दिला अन् विचारू लागल्या की, " काही मनाविरुद्ध होतंय का तुझ्या..? नाही करायचं आहे का तुला हे लग्न..?" तेवढ्यात रेवती उठून बसली, त्यांच्या कडे पाहून डोळे पुसत म्हणाली.., "नाही काकी.., असं काहीच नाही! सगळं छान होतंय फक्त सगळं इतक्या लवकर झालं की, मला हे सगळं स्वीकारायला जरा अवघड पडतं आहे. या घराला, इथल्या माणसांना, पाठीमागच्या बागेला, आपल्या शेतीला, या गावाला सोडून जायचं.. ते ही अश्या ठिकाणी जिथे मी अनोळखी असेन ! ह्या सगळ्या विचारांनी मनात गोंधळ घातलाय. माझ्या माणसांना सोडून जावसं वाटत नाहीये. " हे सगळं काकी शांत बसून ऐकत होत्या, रेवती च बोलून झाल्यावर काकी तिला म्हणाल्या, "तुला खरंच वाटतंय का तू हे सगळं सोडून जात आहेस ? जरा नीट विचार करून सांग हा.., तू आपली माणसं सोडून जाणार आहेस की, दोन कुटुंबाना एकत्र जोडनार आहेस ? " रेवती विचारात पडली. काकी तिला स्वतःच उदाहरण देऊन समजावू लागल्या, " लग्न म्हणजे स्वतःच घर सोडून अनोळखी घरी जाणं नव्हे तर दोन कुटुंबाना एकत्र जोडण्याचा सोहळा असतो. मी जेव्हा ह्या घरात येणार होती, तेव्हा मी ही अनोळखी च होती तुमच्यासाठी आणि तुम्ही सगळे माझ्यासाठी पण, मी या घराला, इथल्या माणसांना आपलंसं केलं. ह्या घराने, इकडच्या माणसांनी मला आपलंसं केलं. आता तू ही पाहते आहेस की, हे घर इथली माणसं आणि मी एकमेकांशिवाय अपुरे आहोत." काकी च म्हणणं रेवतीला पटलं आणि चेहऱ्यावर हास्य आणत तीने काकी ला मिठी मारली. 
      लग्नाचा दिवस उजाडला. अगदी आदल्यादिवसा पासून सगळेच जोरदार तयारी करत होते. लग्नसोहळ्याला सुरुवात झाली. रेवती मांडवात आली. लग्नाच्या विधीं ना सुरुवात झाली. मंगळसूत्र गळ्यात घालता वेळी ती स्वतःशीच पुटपुटली " कुमारीकेची सौभाग्यवती होतेय, दोन घरांना एकत्र जोडतेय". 
लग्न अगदी सुखरूप पार पडलं. विधी पूर्ण झाल्या, फोटोशूट ही झाला, आता वेळ आली होती पाठवणी करण्याची. आडिवलेकर मंडळी सुखाचे अश्रू गाळत होती. रेवती चा पाय अंगणाबाहेर पडत नव्हता. तिने पाठी वळून पाहिले आणि बालपणापासून आता पर्यंतच प्रवास अगदी क्षणभरात केला. अंगणात मांडलेला भातुकली चा खेळ आज तिला नव्याने खेळावासा वाटत होता. लंगडी, खो- खो, लगोरी, लपंडाव, पकडापकडी हे सगळे खेळ खेळलेल्या अंगणात तिला तिचं बालपण सुस्पष्ट दिसत होतं. सगळ्यांनी तिला कुशीत घेऊन नवीन आयुष्यासाठी खूप शुभेच्छा दिल्या. जाता जाता रेवतीने पुन्हा एकदा तिच्या काकी ला मिठी मारली. आणि रेवती सासरी निघाली...!

                     - ©आदिती जाधव.

२ टिप्पण्या:

Featured Post

पत्रास कारण की...

प्रिय तू ,    आज खरंतर इतक्या वर्षात पहिल्यांदा तुला पत्र वगैरे लिहितेय, थोडं दिल खुलास होऊन सांगतेय. तुझी तक्रार असावी माझ्याकडून की, मी का...