पत्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पत्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २६ ऑगस्ट, २०२३

पत्रास कारण की...

प्रिय तू ,
   आज खरंतर इतक्या वर्षात पहिल्यांदा तुला पत्र वगैरे लिहितेय, थोडं दिल खुलास होऊन सांगतेय. तुझी तक्रार असावी माझ्याकडून की, मी कामाव्यतिरिक्त तुझ्याशी कधी बोललेच नाही, असा आपला माझा अंदाज. आज, मला तुझ्याशी मोकळेपणाने बोलावसं वाटतंय. या आधी २ - ३ वर्षांपूर्वी आपल्यात माझ्या बालिशपणामुळे झालेलं इन्स्टाग्रामवर बोलणं. तुझा गैरसमज झाला असावा, तुला माझ्याकडून त्या वेळी काही वेगळ्या अपेक्षा ही असतील कदाचित शिवाय मी अजूनही सांगितलं नाही तुला की, मी तुला का मेसेज केला होता ते... ऐकायचंय का ? अशा अनेक गोष्टी तुला सांगायच्या आहेत, आणि मी फक्त वाट बघत बसलीये तू कधी विचारशील याची पण आता ते घडेल असं मला तरी वाटत नाही. म्हणूनच ह्या पत्रातून उरल्यासुरल्या सगळ्याचं गोष्टी सांगायच्या म्हणतेय. ऐक तर..., त्या दिवशी मी तुला मेसेज केला होता. त्याचं कारण त्या रात्री पहिल्यांदा तुझ्याशी बोलायच्या ओढीने मी स्वतःला आवरू शकले नव्हते. एवढचं ! काय बोलायचं, कसं बोलायचं याचा विचार न करता तुला मेसेज केला आणि... बाकीच्या गोष्टी तुला ठाऊक आहेतच. पावलापावलावर तुझ्या अपेक्षांना खत पाणी घालत आले का रे मी ? तुला उगाचच माझ्यासाठी वाट बघत ठेवलं का ? तुझ्या डोक्यात हे विचार आले की नाही ठाऊक नाही पण मला नेहमीच टोचत आलेत, जेव्हापासून मी ती खिडकी कायमची सोडली आणि खोली रिकामी केली. 

    इकडे हल्ली खिडकीतून पाऊस बघणं होतं नाही, म्हणून तो ही अवकाळी आल्यासारखा बरसून जातोय बहुतेक... आज जुईच्या आग्रहापोटी शिवाजी पार्कला जाणं झालं मग तिथूनच समुद्राचीही गाठभेट घेऊन आली, तो हि पावसासारखा रुसू नये म्हणून... थोडं मोकळं वाटलं, त्या अफाट पसरलेल्या सागराच्या डोक्यावर असलेलं, असंख्य ढगांनी व्यापलेलं आभाळ सुद्धा कमी पडलं तुझ्या आठवणींपुढे... आणि मग शहारलेल्या वाऱ्याच्या हाकेने हात पकडून मला काठावर खेचत आणलं. मागच्या काही रात्री तुझ्याच विचारात मावळून जातात. जे आता परवडत नाहीये. हो, येते... तुझी आणि फक्त तुझीच आठवण येते, हृदयाच्या कुठल्यातरी कोपऱ्यातून एक सल छळत येतो आणि थेट नयनाच्या नाजूक पापण्यांतून अश्रूंच्या रुपात बाहेर पडतो, डोक्याखाली असलेल्या उशीवर जाऊन विसावण्यासाठी... त्याच्याकडे त्याची हक्काची जागा नाही म्हंटलं तरी तीच. मी पण वेडी, कुठे सगळं सांगण्याचं आश्वासन देतेय, हसू येतंय आता... नेहमीच झालंय म्हणा, तुझाशी मनोमनी गप्पा मारणं आणि त्यावर माझी मीच हसणं... अशावेळी एकटेपणा नाही पण उणीव जाणवते. 
   तुला परत भेटावसं वाटत नाहीये, असं काही तरी मी अजिबातच बडबडणार नाहीये, पण तुझ्यात कुठे तरी मला अडकून राहिल्यासारखं वाटतंय तिथून तेवढं मोकळं कर. आता परवडत नाही तुझ्या नावाचा जप वगैरे. हल्ली कविता ही सुचत नाही, मोकळं व्हायची भीती वाटते. पण तुझ्याजवळ हृदयाला नग्न करताना सुखद अनुभूती मिळतेय, ती तात्पुरती का होईना अनुभवू दे... थांबते मी इथेच पुन्हा पाठी वळून न बघण्यासाठी, पुन्हा तिकडे कुठेच आणि कधीच अडकून न बसण्यासाठी. 
नुसतं प्रेम !

(इथे, तुझी कशी म्हणू बरं...? म्हणून फक्त)
ए. 

शुक्रवार, ३० जुलै, २०२१

पत्रास कारण...,

३० जुलै, आज माझ्या मोठ्या बहिनाबाईंचा वाढदिवस ! खरंतर तिच्यावर लिहिताना, तिच्या विषयी लिहिताना किंव्हा तिच्यासाठी लिहिताना मला, माझ्याकडे असलेल्या शब्दांची कमी नेहमी भासते. आज २० वर्षे होतील तिला. माझ्यात आणि तिच्यात ३ वर्षांचा फरक, तसं बालपणीच म्हंटल तर मी ८ - ९ वर्षांची असल्या पासूनच सगळंच नाही म्हणता येणार पण काही गोष्टी आठवतात अगदी ठळक अशा. मग विचार केला तिला २० वर्ष पूर्ण होत आहेत तर आज तिच्यासाठी च लिहू काही तरी, म्हणून आज तिला पत्र लिहितेय..,



प्रिय गुड्डी ताई ( दीदी ),

          पत्रास कारण काही नाही, आज तुझा वाढदिवस म्हणून म्हंटल लिहून टाकूयात पत्र. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! मी या आधी ही सांगत आली आहे आता ही तेच सांगतेय आणि या नंतर ही हेच सांगेन की, जशी आहेस ना तशीच रहा अगदी कायम.., तू आहेस थोडी जास्तच तोंडाळ पण गोड आहेस गं, कधी कधी पटकन बोलून जातेस तुझ्या मनातलं आणि तुझं ते बोलणं समोरच्याला दुःखवतं सुद्धा पण तुझी निरागसता सगळं विसरायला भाग पाडते, हे मी लिहायचं म्हणून लिहीत नाहीय हा माझा अनुभव इतक्या वर्षांचा. बाकी जमत नसेल तरी हसत - खेळत रहा, हसवत रहा आणि माझ्या कायम सोबत रहा! या आधी कधी सांगितलं नाहीय तुला, म्हणा कधी हिम्मत च झाली नाही, सध्या मी तुझ्याशी समोरासमोर बोलत नाहीय म्हणून जराशी हिम्मत एकवटून सांगतेय, मला तुझी गरज असते कायम अगदी प्रत्येक पावलावर, तुला जाणवतं की नाही ते माहीत नाही परंतु तू सोबत नसलीस की तुझी उणीव भासते मला खूप.. खूप जास्त. मला माहितीय..., मी प्रत्येक वेळेला तुझं ऐकतच असं नाही तरीही तुला काय वाटतं हे माहीत करून घेतल्या शिवाय माझं पाऊल पुढे जात नाही. सध्या ही सवय मोडायचा विचार करतेय त्याला कारण असं काही च नाही.
          नात्याने जरी मोठी बहीण असलीस तरी तुझ्या कुशीत कायम आईची माया मिळते, हा ही अनुभव घेतलाय मी उगीच काहीही बोलत नाहीय बरं का.., माझ्या सगळ्यात जवळची व्यक्ती आहेस तू तरीही आता पर्यंत तरी कधी च तुझ्या समोर मनमोकळेपणाने व्यक्त नाही होऊ शकली, का ते माहीत नाही. तुला सगळंच माहितीय असंच समजून चालत आलीय, 'माझ्या आयुष्यातलं कधी काही नाही सांगितलं तुला तरी तुला ते समजणार', हे मी कोरून देऊ शकते. तू माझ्या आणि बारक्यापोरा सोबत कधी मोठ्या बहिणी सारखी वागली नाहीस पण तरीही मला भीती वाटते गं तुझी, जर मी असं काही केलं जे तुला नाही पटलं आणि तू माझ्यापासून लांब गेलीस तर..., या विचाराने इतकं जखडून ठेवलंय मला की तुला काही सांगायचं म्हंटल तरी हृदयाचे ठोके कोकणकन्या च्या वेगाने धावतात. २ - ३ वेळा घेतलाय अनुभव आता जर परत तसं काही झालं तर तू कधीच नाही बोलणार माझ्याशी ठाऊक आहे मला. ह्याच महिन्यात गावाला, छकुली च्या घरी, रात्रीच्या वेळी मी बोलली होती तुला, मला भीती वाटते तुझी, आणि तू विचारलं होतस मला "का..?" माझ्या कडे उत्तर होतं पण तुला समोरासमोर सांगायची हिम्मत च झाली नाही. आता सांगून टाकते, बाकी कसली नाही गं तुला गमावून बसेन याचीच खूप खूप जास्त भीती वाटते. 
          असो.., लहान असताना एकाच ताटात जेवलोय आपण, वाड्यात रंगलेल्या आपल्या वायफळ गप्पा, आंब्याच्या चौथऱ्यावर बसून मांडलेला भातुकलीचा खेळ, तिकडेच बसून खाल्लेली एरंडाची फळं, पाठीमागच्या चुली जवळ पानांच्या भाजलेल्या चपात्या, सगळ्याच आठवणी काळजाला मायेची ऊब देणाऱ्या आहेत. आपण सगळेच हळूहळू मोठे होतोय आता सगळंच बदलेल किंबहुना बदलतंय पण आपल्यातल्या काही गोष्टी जशास तशा राहू द्याव्यात, त्या राहतील ही ! 
          पत्राचा शेवट करतेय, हे पत्र वाचून तुला काय वाटलं हे अजिबात सांगू नकोस ! काळजी घे. 

तुझी, 
आडू ( आदू ).


                                                          
                    - आदिती जाधव.


#मराठी #लेख #पत्र #वाढदिवस #bol_ratraniche

Featured Post

पत्रास कारण की...

प्रिय तू ,    आज खरंतर इतक्या वर्षात पहिल्यांदा तुला पत्र वगैरे लिहितेय, थोडं दिल खुलास होऊन सांगतेय. तुझी तक्रार असावी माझ्याकडून की, मी का...