कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ६ जून, २०२२

असे नाही

तू पाहुनी घे चांदणे सुखाचे
चंद्र तुझ्या भेटीस येईलच असे नाही
गाळुनी घे गं अश्रू दोन सुखाचे
पुन्हा दुःखाला तुझी दया येईलच असे नाही

अंधारात चालणे झालेच पुन्हा
आता उजेडाशी तुझी नव्याने भेट होईल असे नाही
दुःख कसले करावे आता
पुन्हा सुखाशी गाठ पडेलच असे नाही

अत्तराचा सुगंध दरवळत राहिला तरिही
रातराणीचे दुःख कोणाला कळले कसे नाही
चंद्र रोज येऊनि जाईल ही
पण तुझ्या नशिबी त्याचे दिसणे असेलच असे नाही
                 -©आदिती जाधव.

सोमवार, ३० मे, २०२२

मी गायलेले गीत...

मी गायलेले गीत कोणाच्या कानी पडले
छेडले कोणी रे त्या स्वरांना 
ओंजळीतल्या त्या फुलांसम मज
दुःखाचे चांदणे आज अंगणी दिसले

फुलली होती रे ती रातराणी 
आज कोणी तिला घायाळ केले
गत जन्माचे नाते हे आमुचे
तरिही मी तिच्या सुगंधाला ओळखू न शकले

जाणून बुजून हे घडले नाही
नशिबाला स्वतःची ओळख आहे
पाहत राहते ते ही रित्या अवकाशी
चांदण्यांचे बहरने त्याला ही परकेच आहे

कोणी मांडला हा खेळ सावल्यांचा 
खेळणाऱ्यांचा डाव कधी झेलू ना शकले
प्यादे हाती असताना ही
मी स्वतःला वाचवू न शकले
         -©आदिती 


शनिवार, ११ डिसेंबर, २०२१

मी कविता लिहिणार नाही

त्या ओसरत्या सांज वेळी
स्मरती तुझ्या आठवणी
सारेच नकळत घडूनी गेले
आता कोणास दोष देशील ?

निघून जाण्याआधी मी
सांगू पाहत होते काही
तू थांबून ऐकशील
असे उगाचच स्वप्न पाही

माझ्या प्रश्नांची काही
मज उत्तरं गवसली नाही
तू येऊनि विचारशील 
अशी भोळी आशा मज नाही

जाता जाता तुला एकदा
शेवटचे पाहिले होते
ती खिडकी बंद करताना
क्षणभर श्वास रोखले होते

पुन्हा कधी तुझ्या नजरेस 
माझी नजर मिळणार नाही
ही कविता शेवटची, यानंतर 
तुझ्यासाठी मी कविता लिहिणार नाही.

           - ©आदिती

#मराठी #कविता #तू #सायंकाळ #आठवणी 

सोमवार, १५ नोव्हेंबर, २०२१

मोगऱ्याची कळी

पाहिलंय मी त्या मोगऱ्याच्या कळीला
त्या ओल्या पावसात चिंब भिजताना
त्या पांढऱ्या शुभ्र धुक्यात 
अलगत उमलताना
                       सूर्याची कोवळी किरणे
                       अंगावर झेलताना
                       विजेच्या प्रकाशात
                       आनंदाने चमकताना
पाहिलंय मी तिला, सुगंधाने
सगळ्यांना बेधुंद करताना
त्या अत्तराला आपलं 
अस्तिव बहाल करताना 
                      ती कळी असताना च 
                      तिला गजऱ्यात विणताना
                      स्त्रियांच्या केसात 
                      कोमेजून जाताना...!
                 
                  - आदिती जाधव.

#मराठी #मराठीसाहित्य #कविता  #मोगरा #अत्तर #गजरा #बोल_रातराणीचे

बुधवार, १० नोव्हेंबर, २०२१

रातराणी

शब्दांची माळ गुंफता गुंफता
मन अचानक सैरभैर झालं
कसल्याशा सुगंधात नकळत
स्वतःला विसरून गेलं
 
पाऊले अचानक दाराकडे वळली
अंगणातल्या कोपऱ्यात नजर फिरवली
डोळ्यासमोरून कुणीतरी चमकून गेलं
जाता जाता जणू त्या झाडावर 
टिपूर चांदणं शिंपडून गेलं

अंधारलेल्या रात्री चंद्राशिवाय
चांदणं बहरलं होतं
आज पहिल्यांदा त्या झाडावर
कुणी तरी फुललं होतं

वाऱ्याच्या मंद लहरीत ते
त्या अंधारात अलगत डुलत होतं
तिला पाहताच चेहऱ्यावर हास्य उमललं होतं
आज त्या रातराणी ला पाहून
माझं मन ही आनंदाने गुणगुणत होतं
                           
- ©आदिती जाधव.

#मराठी #मराठीसाहित्य #कविता #अनुदिनी #रातराणी

मंगळवार, ७ सप्टेंबर, २०२१

तुझे माझे असे काही तरी राहुनी जावे...

तू दिसावे मजला अन् उगा भास व्हावे
येता जवळी तू अंग माझे शहारून जावे
त्या चांद राती पार न्हाहूनि जावे
तुझे माझे असे काही तरी राहुनी जावे

तुझ्या डोळ्यांना स्पर्श माझ्या पापण्यांचा व्हावा
चालता चालता उगा तुझा हात माझ्या हातात यावा
माझे स्पंदन क्षणात चं इतके तेज व्हावे 
अन् तुझे माझे असे काही तरी राहुनी जावे

अनेक आठवणींचे किस्से 
मांडता येईना शब्दांत त्यांना इतके भाव 
तुझ्या डोळ्यांनी माझ्या डोळ्यात ते पाहुनि घ्यावे
अन् तुझे माझे असे काही तरी राहुनी जावे

का बरं असे नेहमीचं घडावे 
तू येता समोर मी माझे भान हरपुनी जावे
तुझ्या सोबतीत मी थोडे जगून घेताना
तुझे माझे असे काही तरी राहुनी जावे

असे किती काळ चालावे
'कधी तरी तू आणि मी ''आपण'' व्हावे'
या एका इच्छेने मी तुझ्याकडे पाहावे अन्
 तुझे माझे असे काही तरी राहुनी जावे

                        - ©आदिती जाधव.



गुरुवार, १९ ऑगस्ट, २०२१

ओंजळीतला चाफा

ओंजळीतला माझ्या, चाफा सुकुनी गेला..
मज अजुनी वाटे तू येशील पुन्हा
ओंजळीत तुझिया चाफा घेउनी..
ओंजळीत तुझिया चाफा घेउनी..!

सांज ढळुनी गेली
चाफा अजूनही दरवळतोय..
चांदणे शिंपित रात उशाशी
उद्याचे स्वप्न दाखवतेय..

स्वप्नपूर्ती च्या वाटेवर कोणी उभे भासते 
नजर हळूच त्याच्या ओंजळीत जाते
पाहूनी त्याच्या ओंजळीतला चाफा
मज  हलकीच जाग येते..

कळुनी चुकते सारे मजला
सत्य हे काही वेगळेच आहे
सुकलेला चाफा पाहुनी
नजर उंबऱ्यापाशी जात आहे

मज अजुनी वाटे तू येशील पुन्हा
ओंजळीत तुझिया चाफा घेउनी..

               - आदिती जाधव.


#चाफा #ओंजळ #चांदणं #मराठी #मराठीसाहित्य #कविता 

बुधवार, १९ मे, २०२१

पाऊस तुझ्या आठवांचा...

चाहूल तुझी हळूच लागे म्हणे कोणी तरी
घन आज तुझ्या आठवणी बरसवणार आहे

थेंबा थेंबात तुझं असणं जाणवू लागेल मग 
मनात माझ्या ओसाड पाऊस थैमान घालेल

आज वीजा ही कडकडतील ढग ही निनादतील
तुझ्या आठवांचा पाऊस झिम्माड होऊन बरसून जाईल

क्षणात च, प्रत्येक थेंब खोलवर रुतून जाईल
शेवटी काय तर जखमा ओल्या होऊन रक्तबंबाळ मी होईन

तुझं असं असणं तुझ्या नसण्यापेक्षा जास्त त्रास देईल मग
हा पाऊस, कोरड्या मनावर आठवांचे सडे पसरून जाईल

तरीही तुझ्यात भिजण्याचा मोह माझ्याने आवरणार नाही
मनाचं असं कोरडं राहणं मला पुन्हा परवडणार नाही
                              - आदिती जाधव



#पाऊस #आठवणी #चाहूल #घन #जखम #मन #मराठी #मराठीकविता #मराठीसाहित्य #प्रेमकविता #मराठीलेख #bol_ratraniche #आदिती_सांगे

Featured Post

'सणासुदीचे दिवस'

मागची काही वर्षं दिवाळी वगैरे साजरी करत नव्हतो, ह्या वर्षीही नाही केली. घरासमोर दिवे, दाराला तोरण हीच काय ती दिवाळी. घरासमोर रांगोळी नाही, घ...