गुरुवार, ५ ऑगस्ट, २०२१

ही वाट दूर जाते..

आज खूप दिवसांनी सगळे विडिओ कॉल वर भेटलो. इंटरनेट च्या अडचणींमुळे किती वेळा तो विडिओ कॉल अडकत होता, किती वेळा कट करून परत करावा लागत होता पण; सगळे एकत्र येत आहेत म्हंटल की, ह्या उत्साहापुढे त्या इंटरनेटच्या अडचणी काही च नाहीत. खूप साऱ्या गप्पा - टप्पा रंगल्या मग चिडवा - चिडवी, उगाच च खेचा खेची असे अनेक किस्से घडले. रात्र होतेय आणि सगळ्या आठवणी डोळ्यासमोर झिम्मा खेळत आहेत. हसोळ ! माझं गाव खरं तर फक्त गाव कसलं जग आहे ते माझं. तिथे असलेलं माझं कौलारू घर, त्या घरात राहणारी माझी माणसं. सारंच कसं माझं - माझं ! हळू हळू सगळ्या आठवणी डोळ्यासमोर रंगीबेरंगी चित्र रेखाटत होत्या. ते घर, ती वाडी, तो रस्ता....!
       रस्ता..., ह्या रस्त्यासाठी अनेक खटाटोप केलेत. गाव राहीलं डोंगराच्या पायथ्याशी आणि आमची वाडी डोंगराच्या माथ्यावर, त्यामुळे कुठे जायचं असेल तर घाटी पायी उतरून जावं लागायचं, आता रस्ता झालंय आधी तिकडे फक्त पायवाट होती..., जंगलातून जाणारी ! अनेक झाडाझुडपांच्या, फुलांच्या, फळांच्या अर्थात निसर्गाच्या सानिध्यात किती तरी वेळा प्रवास केलाय याच वाटेवरून..., आता ही ती वाट तशीच आहे फक्त थोडी रुंद झाली आणि रस्त्यात रूपांतर झालं, तिकडे एक आंब्याचं झाडं आहे. जिकडे आमची चावडी रंगायची अजून ही रंगते, दगड फेकून फेकून झाडावरचे कैरी,आंबे तोडायचो आणि मग वाड्यात जाऊन प्रत्येक जण स्वतःच्या घरातून तिखट, मीठ, तेल, सूरी आणि वाटी असं एक एक साहित्य आणायचा. वाटीत ( plate ) कैरीचे बारीक फोड करायचो, त्यात तिखट, मीठ आणि तेल घालून मिक्स करून खायचो. मग घरच्यांकडून जो ओरडा पडायचा की आम्ही सगळे परत रस्त्यावर पळायचो. पण आम्ही बनवलेली मसाला कैरी डिश खाऊन इतकं भारी आणि समाधानी वाटायचं की, घरचे ओरडले तरी त्याच दुःख नसायचं. खूप धमाल उडवली आहे ह्याच वाटेवर, सुट्टीतून गावाला गेल्यावर ह्याच वाटेवरून गाव सोडून  मुंबई ला आलो, मुंबई आहे मायानगरी पण जितकं प्रेम त्या वाटेवरच्या मातीने त्या धुळीने दिलं तितकं प्रेम मुंबई च्या डांबरी रस्त्यावर कुठे..?
       ह्याच वाटेवरून सुरू केलेला प्रवास आज इथं पर्यंत आलाय..., म्हणे ही वाट खूप दूर जाते...., आता पाठीमागे वळून पाहिलं की ह्याच वाटेशी असंख्य वेळा केलेलं भांडण आठवतं, कारण काय तर.., याच वाटेवर कित्येक वेळा पडून - धडपडून ढोपर - कोपर फोडून घेतले होते. चुकी त्या वाटेची कधी च नव्हती. आम्ही च वेंधळे होतो पण याचा दोष मात्र कायम ह्या वाटेला मिळाला. कधी कधी वाटतं ही वाट सांगत असावी आम्हाला की, ' बघा, काल पडलात - धडपडलात , ढोपर - कोपर फोडून घेतले म्हणून आज इतक्या सक्षमपणे उभे आहात'. परत पुढे वळून पाहिलं की धुकं धुकं दिसत. जसं जसं पुढे जाल तसं तसं एक नवीन गुपित तुमची वाट पाहत असेल खूप साऱ्या जबाबदाऱ्या, अनेक स्वप्नं, इच्छा - आकांक्षा आणि तितकीच हिम्मत, नवनवीन सुवर्णसंधी, माणसं आणि बरंच काही असं सगळ्यांच गाठोडं घेऊन. मग वाटतं की, होय अगदी खरं! ही वाट दूर जाते..... 

            - आदिती जाधव.

#मराठी #मराठीसाहित्य #लेख #वाट #गाव #चावडी #आठवणी

३ टिप्पण्या:

Featured Post

'सणासुदीचे दिवस'

मागची काही वर्षं दिवाळी वगैरे साजरी करत नव्हतो, ह्या वर्षीही नाही केली. घरासमोर दिवे, दाराला तोरण हीच काय ती दिवाळी. घरासमोर रांगोळी नाही, घ...