सोमवार, ६ जून, २०२२

असे नाही

तू पाहुनी घे चांदणे सुखाचे
चंद्र तुझ्या भेटीस येईलच असे नाही
गाळुनी घे गं अश्रू दोन सुखाचे
पुन्हा दुःखाला तुझी दया येईलच असे नाही

अंधारात चालणे झालेच पुन्हा
आता उजेडाशी तुझी नव्याने भेट होईल असे नाही
दुःख कसले करावे आता
पुन्हा सुखाशी गाठ पडेलच असे नाही

अत्तराचा सुगंध दरवळत राहिला तरिही
रातराणीचे दुःख कोणाला कळले कसे नाही
चंद्र रोज येऊनि जाईल ही
पण तुझ्या नशिबी त्याचे दिसणे असेलच असे नाही
                 -©आदिती जाधव.

सोमवार, ३० मे, २०२२

मी गायलेले गीत...

मी गायलेले गीत कोणाच्या कानी पडले
छेडले कोणी रे त्या स्वरांना 
ओंजळीतल्या त्या फुलांसम मज
दुःखाचे चांदणे आज अंगणी दिसले

फुलली होती रे ती रातराणी 
आज कोणी तिला घायाळ केले
गत जन्माचे नाते हे आमुचे
तरिही मी तिच्या सुगंधाला ओळखू न शकले

जाणून बुजून हे घडले नाही
नशिबाला स्वतःची ओळख आहे
पाहत राहते ते ही रित्या अवकाशी
चांदण्यांचे बहरने त्याला ही परकेच आहे

कोणी मांडला हा खेळ सावल्यांचा 
खेळणाऱ्यांचा डाव कधी झेलू ना शकले
प्यादे हाती असताना ही
मी स्वतःला वाचवू न शकले
         -©आदिती 


Featured Post

पत्रास कारण की...

प्रिय तू ,    आज खरंतर इतक्या वर्षात पहिल्यांदा तुला पत्र वगैरे लिहितेय, थोडं दिल खुलास होऊन सांगतेय. तुझी तक्रार असावी माझ्याकडून की, मी का...