शनिवार, ११ डिसेंबर, २०२१

मी कविता लिहिणार नाही

त्या ओसरत्या सांज वेळी
स्मरती तुझ्या आठवणी
सारेच नकळत घडूनी गेले
आता कोणास दोष देशील ?

निघून जाण्याआधी मी
सांगू पाहत होते काही
तू थांबून ऐकशील
असे उगाचच स्वप्न पाही

माझ्या प्रश्नांची काही
मज उत्तरं गवसली नाही
तू येऊनि विचारशील 
अशी भोळी आशा मज नाही

जाता जाता तुला एकदा
शेवटचे पाहिले होते
ती खिडकी बंद करताना
क्षणभर श्वास रोखले होते

पुन्हा कधी तुझ्या नजरेस 
माझी नजर मिळणार नाही
ही कविता शेवटची, यानंतर 
तुझ्यासाठी मी कविता लिहिणार नाही.

           - ©आदिती

#मराठी #कविता #तू #सायंकाळ #आठवणी 

सोमवार, १५ नोव्हेंबर, २०२१

मोगऱ्याची कळी

पाहिलंय मी त्या मोगऱ्याच्या कळीला
त्या ओल्या पावसात चिंब भिजताना
त्या पांढऱ्या शुभ्र धुक्यात 
अलगत उमलताना
                       सूर्याची कोवळी किरणे
                       अंगावर झेलताना
                       विजेच्या प्रकाशात
                       आनंदाने चमकताना
पाहिलंय मी तिला, सुगंधाने
सगळ्यांना बेधुंद करताना
त्या अत्तराला आपलं 
अस्तिव बहाल करताना 
                      ती कळी असताना च 
                      तिला गजऱ्यात विणताना
                      स्त्रियांच्या केसात 
                      कोमेजून जाताना...!
                 
                  - आदिती जाधव.

#मराठी #मराठीसाहित्य #कविता  #मोगरा #अत्तर #गजरा #बोल_रातराणीचे

बुधवार, १० नोव्हेंबर, २०२१

रातराणी

शब्दांची माळ गुंफता गुंफता
मन अचानक सैरभैर झालं
कसल्याशा सुगंधात नकळत
स्वतःला विसरून गेलं
 
पाऊले अचानक दाराकडे वळली
अंगणातल्या कोपऱ्यात नजर फिरवली
डोळ्यासमोरून कुणीतरी चमकून गेलं
जाता जाता जणू त्या झाडावर 
टिपूर चांदणं शिंपडून गेलं

अंधारलेल्या रात्री चंद्राशिवाय
चांदणं बहरलं होतं
आज पहिल्यांदा त्या झाडावर
कुणी तरी फुललं होतं

वाऱ्याच्या मंद लहरीत ते
त्या अंधारात अलगत डुलत होतं
तिला पाहताच चेहऱ्यावर हास्य उमललं होतं
आज त्या रातराणी ला पाहून
माझं मन ही आनंदाने गुणगुणत होतं
                           
- ©आदिती जाधव.

#मराठी #मराठीसाहित्य #कविता #अनुदिनी #रातराणी

रविवार, ३१ ऑक्टोबर, २०२१

गूढ

आज सहजच ती खिडकीपाशी आली. चंद्राकडे पाहत कुठे तरी हरवून गेली. अचानक भानावर आली, नजर इकडे तिकडे फिरवली. गजबजलेल्या शहरात तिला आज अनेक दिवसांनी शांतता गवसली.., नाही ! शहर मुळीच शांत नव्हते. त्या शहरातला कानेर फक्त तिला जाणवत नव्हता. एरवी जरा जरी आवाज झाला तरी तिची चिडचिड होई. मुंबई सारख्या भल्या मोठ्या शहरात, एका लहानश्या कुटुंबात काव्या श्वास घेत होती. तिच्या देखत त्या शहरात जिवंतपणा उरला नव्हता. सूर्याचं आगमन होतं नाही की, शहर उठू लागतं, सूर्य निघून चंद्र आला तरी या शहरात राहणाऱ्या माणसांचं राबणं थांबत नाही. नाना प्रकारची वाहनं, माणसं, त्यांचा तो आवाज, गडबड, गोंधळ ह्या सगळ्याच गोष्टी तिला रसहीन वाटत होत्या.
     दूरध्वनी वाजला, पाहिलं तर कंपनीने संपर्क साधला होता. काव्याला हल्ली तो मोबाईल ही फारसा रोचक वाटत नसे. काय तेच तेच पाहायचं आणि ती व्हाट्सएप, फेसबुक..., तिला सगळंच कंटाळवाणं वाटतं असे. आज तरी ही तिने इन्स्टाग्राम उघडून पहिला, तिथे कोणीतरी नवीन च फोटो पोस्ट केला होता, ते पाहूनच तिने इन्स्टाग्राम बंद केलं अन् तो दूरध्वनी बंद करणार इतक्यातच तिला व्हाट्सएपवर कोणाचा तरी संदेश आला, तिने पाहिलं तर तिच्या महाविद्यालयातल्या मैत्रिणीच्या व्हाट्सएप गटावर कोणी तरी संदेश टाकला होता. तिने तो संदेश पाहून काहीच प्रतिउत्तर न देता स्टेटस् पाहिले तर केवढे ते स्टेटस् एकाच वेळी टाकलेले, तिने ते न पाहताच दूरध्वनी बंद करून तो टेबलवर ठेवला. तेवढ्यात घरात काही संवाद कानावर पडले, घरात सगळ्यांनीच अजाणतेपणी घेतलेली मौन राहण्याची शपथ तुटतेय की काय..? ह्या विचाराने तिने बाहेर येऊन पाहिलं तर  तिची आई मोठ्या आवाजात काही तरी बोलत होती आणि तिचे बाबा ही त्याच आवाजात तिच्या आईला उत्तर देत होते. त्यांच्या घरी सहसा असेच संभाषण होत असे पौर्णिमा-अमावस्येला, ते ही गडगडाट झाल्यासारखं, कधी कधी तर विजा ही चमकतात. काव्या त्याच पावलांनी परत आली आणि पुन्हा चंद्राकडे पाहू लागली आता तर अनेकांना प्रेमात पडणारा चंद्र ही तिला निस्तेज वाटत होता. त्या लुकलुकणाऱ्या चांदण्या, ते तारे..., सगळेच त्या शहरांतल्या रस्त्यांवर असणाऱ्या सिग्नलच्या दिव्यांप्रमाणे तिला वैतागवाणे वाटत होते. तिने हलकाच सुस्कार सोडला आणि हळुवार डोळे मिटले. तिच्या काळ्याभोर डोळ्यातून, गालावर अलगद पाण्याचा थेंब पडला आणि परत एकदा तिला श्वास घेणं जीवावर आलं.
     काव्या येऊन पलंगावर बसली. एक पेन हातात घेऊन कोऱ्या कागदावर काही अक्षरं टिपू लागली...,

                  इथेच खोल दडले, गूढ माझ्या मौनाचे
                  का शोधताय तुम्ही या कोऱ्या कागदावर
                  जिथे फक्त उमटलीत भावनाहीन चार अक्षरे..!


              - ©आदिती जाधव.

#मराठी #मराठीसाहित्य #गूढ #अनुदिनी #शहर #मुंबई 

सोमवार, १८ ऑक्टोबर, २०२१

तीन-दोन-पाच

जून महिन्यात काही कारणास्तव गावाला जाऊन आली. तसे आम्ही सगळेच गेलो होतो गावी पण पप्पा, मोठे पप्पा आणि बाबी ( लहान आत्या ) लवकर मुंबई ला आले. आम्ही गावाला च थांबलो होतो. पावसाचे दिवस, बाहेर चिखल झाली होती सोबत ओझरता पाऊस होताच.. अंकल, दादा, बाबू आणि वाडीतले इतर पुरुष मंडळी कुरल्या पकडायला गेले होते. मी आणि दीदी ओट्यावरच बसून होतो. आम्हा दोघींना ही खूप वैताग आला होता. बारक्यापोराचे ऑनलाईन क्लासेस सुरू झाले होते, ती त्यात व्यस्त. बसून बसून आम्ही मग एक पत्त्यांचा डाव खेळायचा ठरवला, तेवढ्यात मम्मी, मोठी मम्मी जेवण बनवून बाहेर ओट्यावर येऊन बसल्या. आम्ही पत्ते काढून ते पिसत च होतो, इतक्यात मोठ्या मम्मीलाही आमच्या सोबत खेळायची इच्छा झाली. आता काय खेळायचं..? तीन-दोन-पाच..!
       खेळ सुरू झाला. पहिल्याच डावात माझ्यावर पाच, दीदी वर तीन आणि मोठ्या मम्मी वर दोन हात आले. जेव्हा हे तीन पत्ते उघडले तेव्हा हास्याचा कल्लोळ उडाला.., पहिल्याच डावात मम्मी वर दोन हात आलेले पाहून मी आणि दीदी तर चकित च झालो. बरं, खेळ सुरू झाला, हळू हळू हात घेतले. मोठी मम्मी पहिल्यांदा च तीन-दोन-पाच खेळत होती पण ती इतकं भारी खेळत होती की मला आणि दीदी ला तूर्तास वाटलं होतं की, ही आता आमचे हात खेचणार ! आणि तिने ते खेचले सुद्धा ! माझ्यावर पाच असताना तिने माझे दोन हात अन् दीदी वर तीन हात असताना तिचा एक हात मम्मी ने खेचला. आणि ह्या पहिल्या डावातच तिने आमच्यावर हात चढवले.., ते बघून माझी मम्मी सुद्धा चकित झाली. मी आणि दीदी तर मोठ्या मम्मी कडे फक्त बघत होतो आणि ती आमच्याकडे बघून हसत होती. दुसऱ्या डावात आम्ही ते हात फेडले, आता माझ्यावर दोन, दीदी वर पाच आणि मम्मी वर तीन हात होते. ह्या खेपेला मम्मी ने एकटीने दीदी चे दोन हात खेचले. ते सुद्धा फिटले मग पुढच्या फेरीस मम्मी वर पाच, माझ्यावर तीन अन् दीदी वर दोन हात होते. हा डाव जरा रंगला, ह्या वेळी मम्मी ने आमचे नाही आम्ही मम्मी चे हात खेचले. त्यानंतर मम्मी थोडीशी चिडली सुद्धा पण ह्या वेळी अशी गम्मत झाली अन् मग सगळेच हसू लागलो. आम्ही खेळता खेळता बारक्यापोराने आमचे सहा - सात तरी फोटोस् काढले असतील त्यातला हा एक फोटो 
       आता मुंबई ला येऊन जेव्हा पत्यांकडे लक्ष जातं तेव्हा-तेव्हा हा क्षण डोळ्यांपुढे येतो. त्या दिवशी पत्ते खेळायचा मम्मी चा पहिला वहिला अनुभव तिला इतका आवडला की तिने तीन-दोन-पाच हा खेळ बऱ्याचदा खेळला. तशी ती आमच्या घरातली मोठी सून आहे पण कधी कधी आमच्यातलीच लहान-सहान चेडू भासते. सध्याच्या परिस्थितीत कसला न कसला त्रास तर सगळ्यांना च होतोय पण ह्या काळात कुटुंबाशी पुन्हा एकदा नव्याने एकरूप होता आलं. जवळपास दोन-तीन वर्षांनंतर आम्ही सगळे असे एकत्र भेटलो होतो, एकत्र बसून गप्पा टाकत होतो. पत्त्यांचे डाव रंगवताना एकमेकांसोबत नव्याने रंगत होतो. आता सगळेच वाट पाहतोय परत गावाला जायची आणि ओट्यावर बसून पत्त्यांचे डाव मांडायची.
       - आदिती जाधव.


#मराठी #मराठीसाहित्य #अनुदिनी #कोकणातलंघर #पत्त्यांचाडाव

Featured Post

पत्रास कारण की...

प्रिय तू ,    आज खरंतर इतक्या वर्षात पहिल्यांदा तुला पत्र वगैरे लिहितेय, थोडं दिल खुलास होऊन सांगतेय. तुझी तक्रार असावी माझ्याकडून की, मी का...