गुरुवार, २ सप्टेंबर, २०२१

पाटीवरचा खडू।

        आज मोबाईल मध्ये इंस्टा स्क्रोल करता करता अचानक एक किस्सा आठवला. हो ! गावालाच घडलेला.., माझा लहान भाऊ 'स्वरूप' म्हणजे च माझ्या अंकलचा मुलगा. तसा हुशार आहे पण, अभ्यास म्हंटल की, त्याला भूक लागते, झोप येते, कान दुखतो आणि बरंच काही... ओट्यावर रेंगनारा स्वरूप मला गिअरवाली सायकल चालवायला शिकवत होता. बघता बघता मोठा झाला. आमच्या घरी ' बाबू ' या नावाची पिढी जात परंपरा पुढे सरकवत 'स्वरूप' ला सुद्धा 'बाबू' टोपणनाव पडलं. संध्याकाळची वेळ होती, घड्याळाचे काटे पुढे पुढे सरकत होते. मी आणि बारकापोर ( साक्षी ) ओट्यावरच बसलो होतो. तेवढ्यात बाबू ची एन्ट्री झाली. अभ्यासाचं दप्तर घेऊन त्यातली पाटी आणि खडू काढून आमच्या समोरच अभ्यासाला बसला. अंक लिहायचे ठरलं. पाटीवर रेषा मारायला पट्टी सापडत नव्हती, शेवटी काय तर पुस्तकाच्या आधारानेच रेषा मारल्या. मी सहजच त्याच्या दप्तरात हात घातला आणि मला माझ्या लहानपणीचा सगळ्यात आवडता खाऊ सापडला, 'पाटीवरचा खडू'.
        पाटीवरचा खडू ..., जवळजवळ सहा - सात वर्षांनंतर, त्याला बघून माझ्या तोंडाला पाणी सुटलं होतं. मोह आवरेनासा झाला मग काय टाकला मी तोंडात. इतक्या वर्षांनंतर आजही त्याची चव काही बदलली नव्हती अगदी मातीसारखी चविष्ट. मी कधी मातीची चव घेतली नाही पण; मानवी देह..., वासावरून चवीचा अंदाज घेता येतो की. त्या क्षणाला  मी स्वर्गसुख अनुभवल्यासारखं वाटलं. दुर्दैवाने हे बाबू ने बघितलं, ' ए तू काय खाल्लसं..? खरं खरं सांग खडू खाल्लास ना..? नको खाऊस, टाकून दे आधी, तो चांगला नसतो" असं मला म्हणाला. मी त्याच्याकडे पाहत च बसली त्याच बोलून होण्याआधी मी खडू खाऊन जवळपास संपवला होता. तेवढयात काकी आल्या आणि बाबू ने, काकी ला, मी खडू खाल्ल्याचं सांगितलं. मग काय, काकी ही बोलल्या मला " खरोखर खाल्लास तू..?, खडू काय चांगला असतो..? असं कायपण खात नको जाऊस." मी फक्त मान डोलावली. क्षणभरासाठी मला कळलंच नाही की, 'मी अजून ही लहान आहे की, बाबू मोठा झालाय..?'
         खडू खाणं चांगलं नसतं माहिती आहे मला पण, त्या खडू शी अनेक आठवणी जोडल्या आहेत शिवाय, त्याची चव मला इतकी आवडते की त्यापुढे कसलाच विचार करावासा वाटत नाही. मी हट्टी आहे, थोडीशी रागीट आणि बालिशपणा माझ्या अंगात ठोसून भरलाय त्यामुळे, अंगणवाडी ते इयत्ता चौथी या वर्गांत असताना अनेकदा मित्र - मैत्रिणींशी वाद - विवाद झालेत. गट्टी करायला तर हवी मग ती कशी..? त्यावर छान तोडगा काढला होता आम्ही, 'ज्याला गट्टी करायची असेल, तो एक अख्खा खडू देईल'. आमच्यातले वाद नेहमी या पाटीवरच्या खडू ने च मिटवलेत. मग घरी आल्यावर अभ्यासाला बसताना मम्मी विचारायची, " रोज दोन खडू घेऊन जातेस, करतेस काय इतकं त्याचं..?" आता तिला कसं सांगणार, एक खडू तर गट्टी जमवण्यात हातातून जायचा आणि दुसरा अर्धा पोटात; अर्धा पाटीवर लिहिता लिहिता हरवुन यायचा. मग मी तिला काही ठराविक पण; अगदी खरी खुरी कारणं द्यायची, ती म्हणजे... "आज खूप अभ्यास होता, शुद्धलेखन लिहिलं, गणितं सोडवली, आणि किती चित्र काढली मग खडू संपला, मधल्या सुट्टीत खडू कुठे हरवला काही माहीत च नाही, मी शोधलं पूर्ण वर्गात पण नाही मिळाला,माझ्या मैत्रिणीने आणला नव्हता खडू मग तिला दिला, ती मानसी माहितीये ना तिचा खडू हरवला, मग माझ्याकडच्या खडू मी तिला दिला." माझी ही अशी कारणं ऐकून ती सुद्धा मला तितक्याच जोमाने पुन्हा पश्न विचारायची, मग मी निरुत्तर होऊन शेवटी माघार घ्यायची.
          हा खडू किती तरी वेळा निमित्त ठरलाय, शाळेचे दिवस पुन्हा पुन्हा अनुभवण्याचं. अशी खूप लहान मुलं असतील ज्यांनी कधी खडू खायचा विचार ही केला नसेल; त्या उलट आम्ही खडू हातात आला की, तो थोडासा तरी तोंडात टाकल्याशिवाय करमत नाही. काळ्या रंगाची पाटी, चविष्ट खडू, नवीन पुस्तकांचा वास, वहीच्या उजव्या बाजूच पान ह्या सगळ्या गोष्टी तेव्हापासून प्रिय होत्या त्या अगदी आतापर्यंत. कमाल वाटायची ह्या सगळ्या गोष्टींची ! असं कोणी नसावं बहुतेक.., ज्यांना ह्या गोष्टीं जवळच्या आणि आवडीच्या नाहीत. खरं तर ह्या सगळ्यांमुळे शाळेतले दिवस इतके सुंदर आणि आठवणीत राहण्यासारखे गेले. ज्या दिवसापासून शाळेत जायला लागली, त्या दिवसापासून ह्या सगळ्या गोष्टींशी पक्की मैत्री झाली. अजून ही ती मैत्री तितकीच पक्की आहे इतकी की, कधी ही न तुटणारी..!
          - ©आदिती जाधव.




#मराठी #मराठीलेख #पाटीवरचा_खडू #शाळेचे_दिवस #आठवणी  

1 टिप्पणी:

Featured Post

'सणासुदीचे दिवस'

मागची काही वर्षं दिवाळी वगैरे साजरी करत नव्हतो, ह्या वर्षीही नाही केली. घरासमोर दिवे, दाराला तोरण हीच काय ती दिवाळी. घरासमोर रांगोळी नाही, घ...