शनिवार, २६ ऑगस्ट, २०२३

पत्रास कारण की...

प्रिय तू ,
   आज खरंतर इतक्या वर्षात पहिल्यांदा तुला पत्र वगैरे लिहितेय, थोडं दिल खुलास होऊन सांगतेय. तुझी तक्रार असावी माझ्याकडून की, मी कामाव्यतिरिक्त तुझ्याशी कधी बोललेच नाही, असा आपला माझा अंदाज. आज, मला तुझ्याशी मोकळेपणाने बोलावसं वाटतंय. या आधी २ - ३ वर्षांपूर्वी आपल्यात माझ्या बालिशपणामुळे झालेलं इन्स्टाग्रामवर बोलणं. तुझा गैरसमज झाला असावा, तुला माझ्याकडून त्या वेळी काही वेगळ्या अपेक्षा ही असतील कदाचित शिवाय मी अजूनही सांगितलं नाही तुला की, मी तुला का मेसेज केला होता ते... ऐकायचंय का ? अशा अनेक गोष्टी तुला सांगायच्या आहेत, आणि मी फक्त वाट बघत बसलीये तू कधी विचारशील याची पण आता ते घडेल असं मला तरी वाटत नाही. म्हणूनच ह्या पत्रातून उरल्यासुरल्या सगळ्याचं गोष्टी सांगायच्या म्हणतेय. ऐक तर..., त्या दिवशी मी तुला मेसेज केला होता. त्याचं कारण त्या रात्री पहिल्यांदा तुझ्याशी बोलायच्या ओढीने मी स्वतःला आवरू शकले नव्हते. एवढचं ! काय बोलायचं, कसं बोलायचं याचा विचार न करता तुला मेसेज केला आणि... बाकीच्या गोष्टी तुला ठाऊक आहेतच. पावलापावलावर तुझ्या अपेक्षांना खत पाणी घालत आले का रे मी ? तुला उगाचच माझ्यासाठी वाट बघत ठेवलं का ? तुझ्या डोक्यात हे विचार आले की नाही ठाऊक नाही पण मला नेहमीच टोचत आलेत, जेव्हापासून मी ती खिडकी कायमची सोडली आणि खोली रिकामी केली. 

    इकडे हल्ली खिडकीतून पाऊस बघणं होतं नाही, म्हणून तो ही अवकाळी आल्यासारखा बरसून जातोय बहुतेक... आज जुईच्या आग्रहापोटी शिवाजी पार्कला जाणं झालं मग तिथूनच समुद्राचीही गाठभेट घेऊन आली, तो हि पावसासारखा रुसू नये म्हणून... थोडं मोकळं वाटलं, त्या अफाट पसरलेल्या सागराच्या डोक्यावर असलेलं, असंख्य ढगांनी व्यापलेलं आभाळ सुद्धा कमी पडलं तुझ्या आठवणींपुढे... आणि मग शहारलेल्या वाऱ्याच्या हाकेने हात पकडून मला काठावर खेचत आणलं. मागच्या काही रात्री तुझ्याच विचारात मावळून जातात. जे आता परवडत नाहीये. हो, येते... तुझी आणि फक्त तुझीच आठवण येते, हृदयाच्या कुठल्यातरी कोपऱ्यातून एक सल छळत येतो आणि थेट नयनाच्या नाजूक पापण्यांतून अश्रूंच्या रुपात बाहेर पडतो, डोक्याखाली असलेल्या उशीवर जाऊन विसावण्यासाठी... त्याच्याकडे त्याची हक्काची जागा नाही म्हंटलं तरी तीच. मी पण वेडी, कुठे सगळं सांगण्याचं आश्वासन देतेय, हसू येतंय आता... नेहमीच झालंय म्हणा, तुझाशी मनोमनी गप्पा मारणं आणि त्यावर माझी मीच हसणं... अशावेळी एकटेपणा नाही पण उणीव जाणवते. 
   तुला परत भेटावसं वाटत नाहीये, असं काही तरी मी अजिबातच बडबडणार नाहीये, पण तुझ्यात कुठे तरी मला अडकून राहिल्यासारखं वाटतंय तिथून तेवढं मोकळं कर. आता परवडत नाही तुझ्या नावाचा जप वगैरे. हल्ली कविता ही सुचत नाही, मोकळं व्हायची भीती वाटते. पण तुझ्याजवळ हृदयाला नग्न करताना सुखद अनुभूती मिळतेय, ती तात्पुरती का होईना अनुभवू दे... थांबते मी इथेच पुन्हा पाठी वळून न बघण्यासाठी, पुन्हा तिकडे कुठेच आणि कधीच अडकून न बसण्यासाठी. 
नुसतं प्रेम !

(इथे, तुझी कशी म्हणू बरं...? म्हणून फक्त)
ए. 

सोमवार, ६ जून, २०२२

असे नाही

तू पाहुनी घे चांदणे सुखाचे
चंद्र तुझ्या भेटीस येईलच असे नाही
गाळुनी घे गं अश्रू दोन सुखाचे
पुन्हा दुःखाला तुझी दया येईलच असे नाही

अंधारात चालणे झालेच पुन्हा
आता उजेडाशी तुझी नव्याने भेट होईल असे नाही
दुःख कसले करावे आता
पुन्हा सुखाशी गाठ पडेलच असे नाही

अत्तराचा सुगंध दरवळत राहिला तरिही
रातराणीचे दुःख कोणाला कळले कसे नाही
चंद्र रोज येऊनि जाईल ही
पण तुझ्या नशिबी त्याचे दिसणे असेलच असे नाही
                 -©आदिती जाधव.

सोमवार, ३० मे, २०२२

मी गायलेले गीत...

मी गायलेले गीत कोणाच्या कानी पडले
छेडले कोणी रे त्या स्वरांना 
ओंजळीतल्या त्या फुलांसम मज
दुःखाचे चांदणे आज अंगणी दिसले

फुलली होती रे ती रातराणी 
आज कोणी तिला घायाळ केले
गत जन्माचे नाते हे आमुचे
तरिही मी तिच्या सुगंधाला ओळखू न शकले

जाणून बुजून हे घडले नाही
नशिबाला स्वतःची ओळख आहे
पाहत राहते ते ही रित्या अवकाशी
चांदण्यांचे बहरने त्याला ही परकेच आहे

कोणी मांडला हा खेळ सावल्यांचा 
खेळणाऱ्यांचा डाव कधी झेलू ना शकले
प्यादे हाती असताना ही
मी स्वतःला वाचवू न शकले
         -©आदिती 


शनिवार, ११ डिसेंबर, २०२१

मी कविता लिहिणार नाही

त्या ओसरत्या सांज वेळी
स्मरती तुझ्या आठवणी
सारेच नकळत घडूनी गेले
आता कोणास दोष देशील ?

निघून जाण्याआधी मी
सांगू पाहत होते काही
तू थांबून ऐकशील
असे उगाचच स्वप्न पाही

माझ्या प्रश्नांची काही
मज उत्तरं गवसली नाही
तू येऊनि विचारशील 
अशी भोळी आशा मज नाही

जाता जाता तुला एकदा
शेवटचे पाहिले होते
ती खिडकी बंद करताना
क्षणभर श्वास रोखले होते

पुन्हा कधी तुझ्या नजरेस 
माझी नजर मिळणार नाही
ही कविता शेवटची, यानंतर 
तुझ्यासाठी मी कविता लिहिणार नाही.

           - ©आदिती

#मराठी #कविता #तू #सायंकाळ #आठवणी 

सोमवार, १५ नोव्हेंबर, २०२१

मोगऱ्याची कळी

पाहिलंय मी त्या मोगऱ्याच्या कळीला
त्या ओल्या पावसात चिंब भिजताना
त्या पांढऱ्या शुभ्र धुक्यात 
अलगत उमलताना
                       सूर्याची कोवळी किरणे
                       अंगावर झेलताना
                       विजेच्या प्रकाशात
                       आनंदाने चमकताना
पाहिलंय मी तिला, सुगंधाने
सगळ्यांना बेधुंद करताना
त्या अत्तराला आपलं 
अस्तिव बहाल करताना 
                      ती कळी असताना च 
                      तिला गजऱ्यात विणताना
                      स्त्रियांच्या केसात 
                      कोमेजून जाताना...!
                 
                  - आदिती जाधव.

#मराठी #मराठीसाहित्य #कविता  #मोगरा #अत्तर #गजरा #बोल_रातराणीचे

Featured Post

'सणासुदीचे दिवस'

मागची काही वर्षं दिवाळी वगैरे साजरी करत नव्हतो, ह्या वर्षीही नाही केली. घरासमोर दिवे, दाराला तोरण हीच काय ती दिवाळी. घरासमोर रांगोळी नाही, घ...