रविवार, २५ एप्रिल, २०२१

जगणं सार्थ तेव्हा ठरेल.....






"आज आग लागलीय यांना, धूर निघतोय थोड्या वेळाने राख ही होईल..! एके काळी हिरवीगार, टवटवीत असावी ही पानं. कित्येक स्वप्नं, इच्छा-आकांक्षा उराशी बाळगून पिवळी झाली असावीत, त्यातली किती स्वप्नं, किती इच्छा पूर्ण झाल्या असतील हे त्यांचं त्यांनाच माहीत..!" हा निव्वळ एक विचार होता माझा, जो या पानांना जळताना पाहून मनातून डोक्यात शिरला आणि पुन्हा गोंधळ करायला सज्ज झाला.
        त्या दिवशी खऱ्या अर्थाने ही पालपाचोळ्याला लागलेली आग डोक्यात आग लावून गेली...! जो येतो तो जातो च.., याला अपवाद नसावा. ही पानं कोवळी होती, सुकून जमिनीवर पडली आता त्यांची राख ही होईल. किती आणि कसं आयुष्य जगलं असेल यांनी, त्यांचा जन्म सार्थ ठरला असेल का? झाडावरून जमिनीवर पडताना, जे आयुष्य जगलं या पानांनी त्याचं समाधान वाटतं असेल का यांना? की जन्माला आल्याचा निव्वळ पश्चाताप असावा? कित्येक प्रश्नांनी कहर केला होता पण उत्तर मात्र त्या पानांनाच माहीत...! माणसांचं ही असंच असावं... नाही का...?? 
        जगणं सार्थ व्हायला हवं. नाही तर निव्वळ यायचं आणि मातीत मिसळायचं याला काय अर्थ आहे राव? बरं जगणं सार्थ व्हावं म्हणजे काय? मला तरी असं वाटतं की जगताना थोडी आयुष्याची मजा घ्या, नेहमी त्याने आपली मजा घ्यायची आणि आपण त्याला मजा घेऊ द्यायची, यात कसलं आलंय औचित्य...? छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुख मानून घ्यायलाचं हवं पण कधी तरी भव्य-दिव्य गोष्टींची देखील स्वप्नं पहा फक्त पाहू नका तर ती पूर्ण करायचा प्रयत्न देखील करा , तो प्रवास अनुभवा! दुःखाचं काय ते तर 'मान ना मान मैं तेरा मेहमान' आहे. आयुष्याच्या शर्यतीत कधी तरी हाराल तर कधी जिंकाल, डगमगाल, घाबराल पण खचून जाऊ नका, हिम्मत नका हारु. हारणं-जिंकणं हे सगळं 'क्षणिक समाधान' असतं मान्य आहे, पण तो क्षण तुमच्या आयुष्यात ला महत्वाचा क्षण नक्की च ठरू शकतो, ते क्षणिक समाधान तुम्हाला जगायला प्रेरित नक्कीच करू शकते, जगण्याची मजा ही प्रत्येक क्षणात असते, तुम्ही ती अनुभवून तर पहा...!
        इतरांवर प्रेम करणं तितकंसं कठीण नसावं भोवतेक, कधी तरी स्वतःवर ही प्रेम करा. जगणं हे सार्थ तेव्हा ठरेल जेव्हा तुम्ही स्वतःशी एकरूप व्हाल. तसं तर आपण सगळे च म्हणतो, 'लोक स्वार्थी असतात', हो असतात..., लोक स्वार्थी असतात पण कधी कधी त्या स्वार्थीपणात ही कुणाचा तरी निःस्वार्थ दडलेला असू शकतो, तो ओळखता आला पाहजे कधी कधी आपण इतरांसाठी स्वतःला बंधनं घालतो..., कशाला? तर समोरच्या व्यक्तीला त्रास होऊ नये पण तीच व्यक्ती काही कारणास्तव तुमच्यापासून कायमची लांब गेली तर..., तुम्ही स्वतःला किंव्हा त्या व्यक्तीला त्रास होऊ नये म्हणून केलेल्या खटाटोपात तुमचे सोनेरी क्षण अनुभवायचे राहून जातात त्याच काय? मान्य आहे आयुष्यात काही ना काही तरी राहून जातं पण जे आपल्या हातात आहे त्याला का राहू द्यावं..? याच छोट्या-मोठ्या गोष्टी जगणं सार्थ ठरवतात, नाही का..?
         - आदिती जाधव.

२० टिप्पण्या:

  1. विषयाची पकड चांगली आहे. मांडणी पण छान केली आहे

    उत्तर द्याहटवा

Featured Post

पत्रास कारण की...

प्रिय तू ,    आज खरंतर इतक्या वर्षात पहिल्यांदा तुला पत्र वगैरे लिहितेय, थोडं दिल खुलास होऊन सांगतेय. तुझी तक्रार असावी माझ्याकडून की, मी का...