चहा चा एक जरी घोट घशात गेला ना तरी दिवसाची सुरुवात कशी कडक होऊन जाते. घड्याळावर चालणाऱ्या आयुष्याला दोन सुखाचे क्षण अनुभवण्यास मिळतात. चहाचं आपल्या प्रत्येकाशी एक वेगळंच आणि अतुट नातं असतं. सकाळ-सकाळी चहाचा कप हातात येऊन जो पर्यंत ओठांजवळ जात नाही तो पर्यंत तरी सकाळ झाल्याचं पचनी पडत नाही, एकदा का चहाचा एक घोट प्यायला की शरीरात एक वेगळाच उत्साह संचारतो मग सगळी कामं तडीस नेण्यास आपण सज्ज होतो. आपल्या आजूबाजूला कितीतरी चहाप्रेमी असतात. ज्यांचा दिवस चहाने च सुरू होतो, मध्य ही चहामुळे च अन् शेवट ही चहावरच! मग डॉक्टर किती ही सांगू देत की, 'चहा हा आरोग्यासाठी चांगला नव्हे' पण त्यांचं कुठे कोण ऐकतं आणि जर विषय चहाचा असेल तर एखाद्या चहाप्रेमी साठी तर ते अशक्य च आहे!
उकळत्या पाण्यात जेव्हा चहापुड टाकली जाते आणि मग त्या उकळत्या पाण्याला रंग येतो, तो रंग पाहून कित्येकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटतं मग त्यात आलं, वेलची, दूध, साखर टाकल्यावर तो मधहोश करणारा चहाचा सुगंध नाकात शिरला की चक्क स्वर्गसुख अनुभवल्यासारखं वाटतं. तशी ह्या चहाची खरी मजा तर कोणासोबत तरी बसून मस्त गप्पा टाकताना येते. त्याच्या प्रत्येक घोटासोबत गप्पा ही रंगत जातात. मग तुम्ही-आम्ही वरून कधी-कधी काही गोष्टी तू-मी वर येतात. उन्हाळा, पावसाळा अथवा हिवाळा असो चहा हा लागतोच! 'ह्या उन्हाळ्यात किती उकडतंय, एक कप चहा देना', असे संवाद आपल्यासाठी नवीन नाहीत. पावसाळा आणि चहा यांचं नातं तर वेगळंच, सोबत जर कांदाभजी आणि चटणी असेल तर और क्या चाहीए..! आणि राहिला तो हिवाळा तर गार वातावरणात चहा पेक्षा जास्त गरम आणि कडक दुसरं कोणतं पेय आवडायचा प्रश्नच येतं नाही.
चहा हे निव्वळ पेय नाही, कित्येकांचं आयुष्य ह्या चहाशिवाय अपुरं आहे. चहाचा घोट घेता घेता गप्पा रंगतात, संवाद वाढतो, माणूस माणसाला जाणून घेऊ लागतो, मैत्री होते. काही गोष्टी आपल्या आयुष्यात इतक्या महत्वाच्या आणि गरजेच्या बनून जातात की त्यांची जागा इतर कोणी घेऊच शकत नाही..! आणि या गोष्टींमध्ये चहा हा येतोच. अर्थात कोणत्याही गोष्टीचा अतिवापर हा चांगला नव्हेच. चहा सुद्धा प्रमाणात असावा अति केल्यास आरोग्यासाठी हानिकारक ठरणारचं. पण.. चहा हा शेवटी चहाच! तो आला की जगण्या-मरण्याच्या प्रवासात बरंच काही आणतो. मग आयुष्य नावाच्या पुस्तकात चहा आणि बरंच काही असा धडा सोनेरी अक्षरात लिहिला जातो.
- आदिती जाधव.
chan lihile ahes
उत्तर द्याहटवा❤️🙌
उत्तर द्याहटवाMast
उत्तर द्याहटवाMast
उत्तर द्याहटवाखरंतर मी चहा पित नाही पण तुझे चहावरचे लिखाण वाचून असं वाटतं एकदा try करावा
उत्तर द्याहटवाKhupch chan 💖
उत्तर द्याहटवा