सोमवार, २६ एप्रिल, २०२१

माणसांचं असलेलं वस्तू आणि गोष्टींशी नातं..!




            त्याचं जाणं हे नेहमी सारखं चं होतं, अगदी थाटामाटात..! सायंकाळी त्या रित्या आभाळी त्याने रंगांची उधळण करून, पक्षांना परत घरी परतण्याचा संदेश दिला आणि मग तो ही घरी परतू लागला. झाडं सुद्धा हवेच्या झोक्यात डोलून त्याची पाठवणी करत होती. त्या राजबिंड भास्कराची किरणं डांबरी रस्त्यावर पहुडली होती. ते दृश्य अगदी डोळ्यात साठवून ठेवण्यासारखं..! आमचं गाव डोंगरावर, सूर्याचं स्वागत आणि पाठवणी हे दोन्ही सोहळे आम्हांस अगदीच प्रिय..!
    ह्या कोरोना च्या काळात घराबाहेर पडणं अशक्य झालेलं आता ही अशक्य चं आहे म्हणा, पण गेल्या दिवाळीत दोन महिन्यांसाठी आम्ही गावाला जाऊन आलो, तब्बल दोन वर्षांनंतर.., तो आनंद पोटात मावेनासा होता. तिथली ती संध्याकाळ तर काळजाचा ठाव घेणारी होती. ते चित्र न्याहाळता अचानक लक्ष त्या नागमोडी वळणाच्या डांबरी रस्त्यावर गेलं. एकेकाळी इथे पायवाट होती आता डांबरी रस्ता झालाय. तसं तर फक्त त्या वाटेचं रूपांतर रस्त्यात झालंय. सुरुवातीला थोडा परकेपणा जाणवला. लहान असल्यापासून ह्या वाटेवर येणं-जाणं, धावणं-पडणं चालू चं होतं पण त्या दिवशी वाटेवरची ती माती, तो धुरळा सगळंच कसं खूप जवळचं वाटतं होतं. आता त्या वाटेवर धुरळा नाहीय डांबर आहे, हे सत्य स्वीकारणं क्षणभरासाठी अवघड गेलं पण बदल हा निसर्गाचा नियम आहे, हे ही तितकंच खरं आणि जर तो बदल सगळ्यांच्या चांगल्यासाठी झाला असेल तर तो स्वीकारायला हवा. ती वाट मला माझ्या घराच्या अंगणात सोडायची हा डांबरी रस्ता देखील मला माझ्या घरच्या अंगणात च सोडतो पण त्या मातीत, त्या धुरळ्यात जो आपलेपणा होता ना तो या डांबरात मुळीच नाही
    हो..! त्याच त्याच गोष्टींमध्ये अडकून राहिलं तर माणसाचा बौद्धिक, मानसिक विकास थांबू शकतो, यात काही शंका च नाही. पण काही गोष्टींमध्ये बदल झाला तर तो लगेच स्वीकारता तरी कुठे येतो, काही गोष्टींची सवय झालेली असते आणि सवयींना औषध नसतं. तसा प्रयत्न करतेय आवडत्या गोष्टींमध्ये झालेला बदल स्वीकारायचा. माणसांमध्ये बदल होणं साहजिक च आहे आणि त्याची सवय सुद्धा झाली आहे, मलाच काय जवळजवळ सगळ्यांना झाली असावी पण गोष्टी, वस्तू ह्या आयुष्याला रंग देतात, त्यांच्याशी आपलं वेगळंच नातं तयार होतं. उगीच नाही किचन मधलं एखादं भांड हातातून निसटलं आणि तुटलं तर आई रागावते, ओरडते त्याला कारण तिचं असलेलं त्या किचनमधल्या प्रत्येक भांड्याशी नातं. नात्यांमध्ये बदल झाला की बहुदा दुरावा येतो, हे अनुभवाचे बोल बाकी काही नाही. माणसांमध्ये, गोष्टींमध्ये, वस्तूंमध्ये बदल माणसंच घडवतात तरीही त्या वस्तू, गोष्टी माणसाला आहे तसा स्वीकारतात कसली ही तक्रार न करता आणि आपण माणसं मात्र एका झटक्यात सगळी नाती मोडकळीस आणतो पाठचा-पुढचा कसला ही विचार न करता..!
         - आदिती जाधव.

४ टिप्पण्या:

Featured Post

पत्रास कारण की...

प्रिय तू ,    आज खरंतर इतक्या वर्षात पहिल्यांदा तुला पत्र वगैरे लिहितेय, थोडं दिल खुलास होऊन सांगतेय. तुझी तक्रार असावी माझ्याकडून की, मी का...