गुरुवार, १० जून, २०२१

असाच एक पावसाळा, शेतकऱ्याच्या घरातला...

        जून महिना...! पावसाळा सुरू झाला होता. तसे सगळेच पावसाची वाट पाहत होते. शेतकरी तर डोळे ढगांकडे लावून बसले होते. वातावरण ढगाळ होत चाललं होतं. सगळ्यांना वाटलं आता पाऊस येणार म्हणून गावकरी ज्यांची-त्यांची कामे संपवून घरी परतू लागले होते. वेळ संध्याकाळची होती. राघव त्याच्या घराच्या अंगणात येऊन, आई-बाबांची वाट पाहू लागला. तिकडे शेतात राघव ची आई, राघवच्या बाबांना सांगू लागली, 'रवांदेत ता काम आता, चला आटपा लवकर, माझो लेक रघु ( राघव ला घरी प्रेमाने रघु नावाने बोलावीत) वाट बघत असत, तुमची आय पण तिकडं मागल्या दारावर बसून असत.' तेवढ्यात रघुचे (राघव) चे बाबा शेतातून बाहेर आले आणि रघुच्या आई ला म्हणाले, 'पोटापाण्यासाठी करूक लागता गो, जरासो एळ झालो तर त्याका काय व्हता, माझो लेक अन् माझी आय घेतं ली समजून माका.' असे म्हणून ते दोघे ही घराच्या दिशेने वाटचाल करू लागले. तिकडे घरी रघुची आजी रघु ला, 'आय न बाप येवू ची एळ झाली पाण्याखाली इस्तेव घाल' अशी पाटच्या दारावरून सांगू लागली. 
         संध्याकाळी सहा च्या सुमारास रघु चे आई-बाबा घरी आले. 'इलसं काय र पोरा..?' असं विचारून आजी ने रघुच्या बाबांचं स्वागत केलं. 'इलयं, इलयं' असं म्हणून रघुचे बाबा उत्तरले. रघुचे बाबा हात-पाय धुवून बाहेर येताचं रघु त्यांच्या पाठी घरभर फिरून दिवसभरात काय काय घडले ते सांगू लागला. त्याने, त्याच्या मित्राला, त्याच्या भावाच्या सायकल बद्दल बोलताना ऐकलं होतं आणि हे तो त्याच्या बाबांना सांगणार इतक्यात ढगांच्या गडगडण्याचा आवाज कानी ऐकू आला.., क्षणभरासाठी तो थांबला, सगळेच शांत झाले. आता पाऊस येणार, वीज जाणार, घरात अंधार होणार म्हणून रघुची आई रात्रीच्या जेवणाची तयारी करू लागली. पाऊस आला तर गाई-बैलांचा चारा भिजेल अन् मग ते उपाशी राहतील म्हणून राघूचे बाबा चाऱ्यावर ताडपत्री घालायला गेले. रघूचं बोलणं कोणी ऐकत च नव्हतं म्हणून त्याला राग आला न तो जाऊन ओट्यावर बसला. क्षणार्धात पावसाने हजेरी लावली, सरीवर सरी बरसू लागल्या. अचानक रघुच्या डोक्यावर पाण्याचे थेंब पडू लागले, त्याने वर पाहिलं तर घरावरच्या छपरातून पाण्याचे थेंब गळत होते. तो उठला आणि आईला सांगायला गेला तर तिकडे ही छपराला भोकं पडून त्यातून पाणी गळतं होतं.
             रात्रीच्या जेवणाची तयारी करता करता रघूची आई जिथं-जिथं छप्पर गळत होतं तिथं-तिथं घरातली भांडी आणून ठेवत होती. रघु मात्र उभा राहून सगळं पाहत होता. तेवढ्यात घरच्या पाठीमागे रघुचे बाबा रघुला बोलावतं आहेत हे रघुला कळताच तो तसाच धावत घराच्या पाठीमागे गेला. त्याने पाहिलं, त्याचे बाबा गोठ्यात उभे होते, तिथे ही जागोजागी पाणी गळंत होतं. रघुचे बाबा रघुला घरातून भांडी आणायला सांगत होते, तो घरात आला आणि भांडी शोधू लागला पण सगळी भांडी घरात छप्पर गळत होतं तिथं लावली होती. त्याने जाऊन हे त्याच्या बाबांना सांगितलं. गाई-गुरं भिजू नयेत म्हणून त्याच्या बाबांनी हाताला मिळतील त्या पिशव्या, कागद सगळं भर पावसात गोठ्याच्या वर जाऊन जिथं-जिथं पाणी गळतं होतं तिथं-तिथं लावल्या. ते कागद, पिशव्या वाऱ्याने उडून जाऊ नयेत यासाठी त्यावर दोन-दोन दगड ठेवले. रघु हे सगळं लांबून च पाहत होता. त्याची आई पावसापासून स्वतःचं घर वाचवत होती, सांभाळत होती, सावरत होती. अन् त्याचे बाबा ज्यांच्यामुळे त्याचं घर चालतं त्यांचं घर पावसापासून वाचवत होते. कसा-बसा पाऊस थांबला आणि रघुच्या घरी रात्री च जेवण झालं. झोपायची तयारी सुरू झाली पण; रघुची आई मात्र परत पाऊस येईल आणि छप्पर गळेल या चिंतेत जागीच राहिली. शेवटी पाऊस आला अन् छप्पर गळू लागले. रघुची आई परत सगळी भांडी आणून जागजागी ठेऊ लागली, रघुचे बाबा ही झोपेतून उठून रघुच्या आई ला मदत करू लागले. 
             हे पाहून त्याला लगेच च सकाळी त्याचा मित्र, त्याच्या भावाच्या सायकल बद्दल बोलत होता ते आठवलं, ते बाबांना ऐकून घ्यायला पावसामुळे वेळ मिळाला नाही आणि त्यामुळे त्याला आलेला राग, हे सगळं त्याच्या डोळ्या समोर आलं. त्याला रहावलं नाही, डोळयातून अश्रू वाहू लागले त्यामुळे त्याला घराच्या छप्परातून टपकणाऱ्या पावसाचे थेंब त्याला दिसेनासे झाले. आज संध्याकाळी जेव्हा रघुचे आई-बाबा घरी आले तेव्हा रघुला त्यांना सांगायचं होतं की, 'रघुच्या मित्राचा मोठा भाऊ त्याची जुनी सायकल विकणार आहे अन् ती सायकल रघु ला हवी आहे,' पण; घरची परिस्थिती पाहता स्वतःची अनाठायी निर्माण झालेली इच्छा आणि आईबाबांचे कष्ट यामध्ये त्याला महत्वाचं कोण हे कळून आलं. रघुने त्याची इच्छा मनातच ठेवली अन् ओल्या डोळ्यांनी झोपी गेला. 
             

     
                                            - आदिती जाधव.


#पावसाळा #शेतकरी #घर #छप्पर #इच्छा #सायकल #मराठी #मराठीसाहित्य #लघुकथा #महाराष्ट्र #मालवण #आई #बाबा #आजी #अंगण #रात्र  #अश्रू  #पावसाचेथेंब

६ टिप्पण्या:

Featured Post

पत्रास कारण की...

प्रिय तू ,    आज खरंतर इतक्या वर्षात पहिल्यांदा तुला पत्र वगैरे लिहितेय, थोडं दिल खुलास होऊन सांगतेय. तुझी तक्रार असावी माझ्याकडून की, मी का...