बुधवार, २ जून, २०२१

मेरे ग़मों की रात का तू उजला सवेरा..

         खूप महिन्यांपूर्वी 'राहत फतेह अली खान' यांनी गायलेलं 'ये जो हल्का हल्का सुरूर है' गाणं ऐकलं होतं, त्या गाण्यातील 'मेरे ग़मों की रात का तू उजला सवेरा' ही ओळ काळजाला चर्रर्र करून गेली ! अन् सहज च आजी चा चेहरा डोळ्यासमोर आला. 
          आपल्यापैकी कोणीही किती ही मोठं झालं तरी बालपण विसरणं आज वर तरी शक्य झालेलं नाही, या नंतर शक्य होईल असं वाटतं ही नाही. आपल्या सगळ्यांनाच बालपणीच्या आठवणींमध्ये रमायला खूप आवडत असेल यात शंका नसावी. त्या वयातील ती निरागसता, तो अल्लडपणा कमालीचा असतो. ते निष्पाप मन अन् अतरंगी तन ! सगळंच कसं छान छान. मला आठवणींमध्ये रमायला खूप आवडतं तिथे पुन्हा पुन्हा जगायला ही! लहान मूल आईबाबांच्या सहवासात जास्त रमतं यात वाद नाही पण माझ्यासाठी माझी आजी जास्त जवळची आहे अजूनही! माझी आजी यमुनाबाई धोंडू जाधव. ती आता ७० - ७५ च्या आसपास च्या वयात असेल आणि मी ४ महिन्यानंतर १८ वर्षांची होईन पण हे सगळं सांगण्यापुरतं. मला अजूनही आजीच्या मांडीवर डोकं ठेऊन झोपायला आवडतं, तिच्याशी मस्ती करायला कधी-कधी उगाचच तिच्याशी भांडायला.., आम्ही दोघी खूप जवळच्या मैत्रिणी, ती गावी असली अन् मी मुंबई ला तरीही, जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा वर्षभराच्या गप्पा - टप्पा होतात. तिचा माझ्यावर खूप जीव आहे आणि माझा तिच्यावर जरा जास्त ! 


          माझ्या आजीचं माहेर पाट-गोवळ (कोकण) तिकडे मालवणी भाषा बोलली जाते. माझ्या समोर जेव्हा कोण 'माका-तुका' बोलतं तेव्हा डोळ्यासमोर पटकन आजीचा चेहरा येतो. तिच्यासोबतची एक आठवण वेचून सांगणं जरा कठीण च.., इतक्या साऱ्या आठवणी इतकी धमाल आणि बरंच काही..,तरीही विशेष आठवण सांगायची झाली तर.., आमच्या गावच्या घराच्या समोर एक आंब्याचं झाडं आहे. त्याला आम्ही बिटका, चिकयारी आंबा म्हणतो, पावसाळ्यात या झाडावरचे आंबे आमच्या घराच्या अंगणात परसलेले असतात अजून ही, काही पिकून पडलेले तर काही वाऱ्यामुळे कच्चे पडलेले. मी गावाला शाळेत असताना, मी शाळेतून घरी यायच्या आधी, आजी ते पिकेलेले चांगले चांगले आंबे माझ्यासाठी जमवून ठेवी अन् मी शाळेतून घरी आली की सगळ्यात आधी पाटच्या दारावर बसून ते आंबे खाऊन टाकी. सध्या ह्या पावसाळ्यात आंबे भरपूर खायला मिळतात पण आजीने प्रेमाने जमवून ठेवलेल्या त्या बिटक्या आंब्यांची सर कशाला च नाही. ती गावाला राहते, या कोरोनाकाळात ह्या मे महिन्यात गावाला जायला मिळालं नाही तिला भेटता नाही आलं फोन केला की आवर्जून एक च प्रश्न विचारते, "गावाला कधी येणार" खरं तर तिच्या ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाहीय पण, "येईन लवकर" हेच उत्तर देते. हल्ली तिची उणीव सर्वत्र भासते.
          लहानपणी आई ओरडली की जाऊन तिलाच गच्च मिठी मारायची अन् डोळे सुजे पर्यंत रडायची, मग आजी माझे डोळे तिच्या हाताने, लुगडयाच्या पदराने पुसायची. तिने अश्रू पुसले की त्या अश्रूंना ही मोलाची किंमत मिळते. मग ती आणि मी ओट्यावर बसून असायचो बसल्याजागी मी कधी झोपून जायची कळायचं च नाही. आज ही जेव्हा आई ओरडते ना वाटतं जावं आणि गच्च मिठी मारावी आजी ला...खरं सांगायचं झालं तर, या आधी इतकी ओढ कधी च लागली नव्हती तिची पण आता तिच्या मांडीवर डोकं ठेऊन झोपावसं वाटतंय, तिच्या कुशीत निजावसं वाटतंय, तिला मिठी मारून मन भरून रडावसं वाटतंय.. तिचं असणं माझ्यासाठी श्वास घेण्याइतकं गरजेचं वाटतंय...!

                                  - आदिती जाधव.

३ टिप्पण्या:

Featured Post

पत्रास कारण की...

प्रिय तू ,    आज खरंतर इतक्या वर्षात पहिल्यांदा तुला पत्र वगैरे लिहितेय, थोडं दिल खुलास होऊन सांगतेय. तुझी तक्रार असावी माझ्याकडून की, मी का...