रात्र झाली होती. तो अर्धा चंद्र किती छान दिसत होता. स्वरा रात्रभर त्या चंद्राकडे पाहत, चांदण्यांमध्ये रमून गेली होती. तिला रात्र फार आवडायची. चंद्र, तारे, चांदण्या सगळे च तिच्या खूप जवळचे ! घराच्या अंगणातली रातराणी तर तिचा जीव की प्राण ! पण, एके रात्री सगळं तिला परकं झालं, काहीच आवडेना झालं. स्वरा, ६ वर्षांची नाजूक पोर, जी सगळ्यांमध्ये रमायची पण हरवून जायची ती फक्त स्वतःच्या जगात. स्वतःशी सवांद साधायला, स्वतःमध्ये हरवून जायला तिला खूप आवडे. पण, त्या रात्री ती नेमकी स्वतःला परकी भासली, त्या रात्री चंद्र, तारे, चांदण्या, अंगणातली रातराणी सगळं च तिला परकं वाटलं.
रात्रीचे अकरा वाजले होते. घराचा दरवाजा कोणी तरी ठोकवल्याचा आवाज आला. तिने आधीच अंदाज लावला होता की, तिचे बाबाच बाहेर दरवाजा ठोकवीत असतील. तिच्या आईने दरवाजा उघडला. स्वराचे बाबा घरात आले. हातपाय धुवून जेवायला बसले, जेवून झालं. स्वरा तशीच तिच्या खोलीत गेली आणि हातात कोणता तरी कागद घेऊन बाहेर हॉल मध्ये येत होती इतक्यात; तिला तिच्या आई चा आवाज ऐकू आला, ती क्षण भर स्तब्ध उभी राहिली. दुसऱ्याच क्षणाला तिला तिच्या बाबांचा ही आवाज ऐकू आला, ती तशीच हॉल च्या दिशेने गेली. तिने पाहिलं तर तिचे आईबाबा एकमेकांशी मोठ्या आवाजात बोलत होते, खर तर ते दोघे भांडत होते. तिला कारण समजलं नाही पण; तिच्या बाबांनी तिच्या आईवर हात उचलेला पाहून, तिच्या डोळ्यात ढग दाटून आले परंतु ते ढग बरसायला तयार नव्हते. तिला रडायचं होतं पण डोळ्यातून पाणी च निघत नव्हतं. तिला तिच्या बाबांना सांगायचं होतं, 'नका मारू असं माझ्या आईला', परंतु तिची हिम्मत होतं नव्हती. तिला तिच्या आईला ही सांगावंसं वाटतं होतं, 'नको अशी छोट्या-छोट्या गोष्टींवरून बाबांशी भांडत जाऊस' पण, तिला ते सांगायला जमत नव्हतं. ती ओल्या डोळ्यांनी तिच्या खोलीत जाते आणि तिच्या हातातला कागद पाहत असते, ज्यावर तिने आईबाबा आणि स्वरा तिघांच चित्र काढलेलं असतं. ते पाहता पाहता ती झोपी जाते.
ह्या सगळ्या गोष्टी तिच्यासाठी नवीन नव्हत्या. तिचे आई-बाबा गेले २-३ महिने नेहमी भांडायचे पण आज वर तिच्या बाबांनी तिच्या आईवर कधी हात उचलला नव्हता. ६ वर्षांची पोरं ती, तिला जे घडतंय ते दिसत होतं पण समजतं नव्हतं. तिचे आईबाबा का नेहमी भांडतात या प्रश्नाचं उत्तर ती शोधू पाहत होती; ते उत्तर तिला मिळत नव्हतं. तिला ह्या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होत होता. हे सगळं ती त्या चंद्राला सांगू पाहत होती सगळं काही, अन् नेमकी त्या रात्री अमावस्या होती. तो चंद्र काही तिला भेटला नाही. तिने ती रात्र चंद्राची वाट पाहत ओल्या डोळ्यांनी काढली, तो चंद्र मात्र आलाच नाही. त्या दिवशी तिला खूप एकटं वाटलं. घडत असलेल्या प्रकारामध्ये ती काहीच करू शकत नव्हती. ना ती चंद्राला शोधू शकत होती ना तिच्या आईबाबांना भांडण्यापासून थांबवू शकत होती. तिला स्वतःचाच खूप राग आला होता. ह्या सगळ्यांमुळे ती सगळ्याच गोष्टींपासून अगदी स्वतःपासून ही दुरावत चालली होती. जे घडतंय ते मुकाट्याने पाहत होती आणि रात्री खिडकी जवळ बसून रडत होती. स्वराला होणाऱ्या त्रासाबद्दल तिच्या आईबाबांना कल्पना देखील नव्हती. ते दोघे त्यांच्यामध्ये असलेल्या वादामुळे स्वराचा विचार देखील करत नव्हते, आणि याचच तिला खूप दुःख होतं
एके दिवशी तिने ठरवलं जाऊन आईबाबांना सरळ विचारायचं, 'तुम्ही का भांडता सारखे सारखे?' नेहमी प्रमाणे तिचे बाबा रात्री अकरा वाजता घरी आले आणि परत तिच्या आईबाबांचं भांडण सुरू झालं. स्वराला राहवेना, तिने शेवटी ओरडून तिच्या आईबाबांना विचारलं, 'तुम्ही का नेहमी भांडता?', हे ऐकून तिच्या आईने रागात तिच्या गालावर खूप जोरात मारलं आणि म्हणाली , 'तुझ्यामुळे होतंय हे सगळं, नसती जन्मला आलीस तर बरं झालं असतं.' हे ऐकून स्वराच्या बाबांचा राग अनावर गेला आणि त्यांनी परत तिच्या आईवर हात उचलला. स्वरा मात्र स्तब्ध उभी होती, तिच्या कानात आईच वाक्य घुमत होतं. तिला काहीच कळलं नाही. ती अजूनही तिथे स्तब्ध उभी होती, पण हे कुणाच्या लक्षात आलं नाही. तिचे आईबाबा भांडणात इतके गुंतले होते की, स्वरा ते पाहून तिच्या खोलीत गेली, आणि हे त्यांना कळलं देखील नाही. ती रात्रभर विचार करत होती. तिच्या डोक्यात एकच प्रश्न होता आणि तो म्हणजे, 'खरंच ! हे सगळं माझ्यामुळे होतंय का ?'
तिची आई रागात सहज बोलून गेली पण, स्वराच्या मात्र ते क्षणभरातच मनात खोलवर रुतून गेलं. आज ह्या गोष्टीला दोन दिवस होतील. ह्या दोन दिवसात स्वतःमध्ये हरवणारी स्वरा, स्वतःचा तिरस्कार करू लागली. आईबाबांच्या भांडणाला स्वतःला दोषी ठरवत होती, तिला स्वतःचा खूप राग येऊ लागला. तिला चंद्र, तारे, चांदण्या इतकं च काय तर जीव की प्राण असणारी तिची रातराणी देखील नकोशी वाटू लागली. रागारागात स्वराला सहज बोलून गेलेली तिची आई दुसऱ्याच दिवशी विसरून सुद्धा गेली; पण त्या एका वाक्यामुळे स्वरा मात्र स्वतःला परकी झाली ती कायमचीच !
- आदिती जाधव.
#bol_ratraniche #swara #मराठी #मराठीकविता #मराठीसाहित्य #मराठीलेख #मराठीकथा #लघुकथा #रात्र #चंद्र #तारे #चांदण्या #रातराणी #आईबाबा #राग #चित्र #परकेपणा
प्रसंग छान मांडला आहेस. अगदी अनुभवल्यासारख वाटले
उत्तर द्याहटवाखूप सुंदर 👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवा-prathamesh uravane
मस्त
उत्तर द्याहटवाKhup chan ❤🥀
उत्तर द्याहटवाखुप छान आदिती ...पण अजून इमोशन्स पाहिजे होते
उत्तर द्याहटवाSuch a heartbreaking story. Very well expressed. Keep going!
उत्तर द्याहटवा