गुरुवार, २० मे, २०२१

पहिल्या पावसातली 'ती'

          पहिला पाऊस म्हंटल की, मातीचा सुगंध, झाडांच्या पानांवरचे पावसाचे थेंब, ओले रस्ते, ढगांचा गडगडाट, विजेचा कडकडाट सगळंच कसं डोळ्यासमोर येते ते ही आपोआप. त्या सरींच्या ओसाड पावसात तलप येते ती चहा ची मग तो चहा घेऊन 'ती'च्या जवळ उभं राहून ओसाड सरींचा तर कधी थेंबाथेंबांचा पाऊस अनुभवायचा, त्या क्षणी मनापासून जाणवतं की ह्या पेक्षा दुसरं सुख नाही. 'ती' पावसाच्या थेंबानी भिजलेली, थंडगार वाऱ्याने शहारून गेलेली त्यातल्यात्यात काही थेंब स्वतःजवळ जपून ठेवणारी अन् मला घरबसल्या पाऊस अनुभवून देणारी.. तसं ह्या 'ती' ची कल्पना थोडी निराळी आहे पण अगदी खरी खुरी..!  आता प्रश्न असा की ती म्हणजे नक्की कोण ? तर ही 'ती' म्हणजे खिडकी ! जी मला घरबसल्या पावसाची मजा देते, रात्री चंद्र-चांदण्यांनी भिजवून टाकते आणि दिवसाढवळ्या त्या अवाढाव्य आभाळात सूर्य डोळ्यांसमोर असूनही आपल्यापासून किती लांब आहे याची जाणीव करून देते.


           'ती' म्हणजे ही खिडकी मी राहत होती त्या वसई च्या घरातली, हिच्याविषयी सांगायचं झालं तर.. हिने मला असंख्य स्वप्नं, इच्छा आणि भरभरून प्रेम, आपलेपणा दिलाय. मी इथून चं जग बघितलं होतं, जे अस्पष्ट, अचाट आणि बऱ्यापैकी तुझं-माझं करणार होतं. या खिडकी ने मला अमाप अशा आठवणी दिल्यात ज्यात मी अजून ही वावरते, कधी कधी त्यात पुन्हा जगून घेते. तशी एक आठवण सांगायचं झालं तर कठीणचं आहे, हिने मला चंद्र दाखवलाय अवकाशातला ही आणि.. असो ! आम्ही मे महिन्यात गावावरून वसई ला रहायला आलो अन् पावसाने आमचं जोरदार स्वागत केलं होतं. बिल्डिंग मध्ये राहत असल्याकारणाने पावसात भिजायला जाणं जवळजवळ अशक्य त्याला कारण माझी आई. ताप, सर्दी, खोकला येईल म्हणून ती पावसात भिजायला तेव्हाही देत नव्हती आणि अजून ही देत नाही. तेव्हापासून मी 'ति'च्यासोबत अर्थात त्या खिडकी सोबत पाऊस अनुभवायला सुरुवात केली. पाऊस आणि वारा यांचं एकत्र आगमन झालं की पावसाचे थेंब चेहऱ्यावर यायचे अन् 'ति'ला मला दोघींना पावसाचा सोहळा अनुभवण्यास मिळायचा आणि आम्ही त्याचा भरभरून आनंद लुटायचो.
           माझा वसईतला पहिला पाऊस अजून ही आठवतोय आणि पहिल्या पावसातली 'ती' सुद्धा.., त्यावेळी ती ओली चिंब होती, पावसाच्या थेंबानी छान सजली होती, गार वाऱ्याने किंचित शहारली देखील होती. 'ति'ला पाहून मला तेव्हा इतकं छान वाटलं होतं ना की मला आता शब्दांत मांडताना काय लिहू आणि किती लिहू असं होतंय. इतरांसाठी 'ती' फक्त खिडकी असली तरी माझ्यासाठी 'ती' माझी खूप जवळची मैत्रीण आहे, 'ति'ला माझी सगळी गुपितं ठाऊक आहेत. मी आता ज्या घरात राहते इथे ही खिडकी आहे परंतु त्या खिडकी ची गोष्ट थोडी निराळी आहे अगदी तिच्या अन् माझ्या नात्यासारखी..! आमचं नातं अतुट आणि निर्मळ होतं अजून ही आहे चं, तसं नातं या इकडच्या  खिडकी सोबत होईल की नाही माहीत नाही. ते घर सोडून इकडे आल्यापासून 'ति'च्या सोबत जगलेला, अनुभवलेला एकूण एक क्षण आठवतो, पाऊस तर विसरता येणार च नाही..!  ह्या आठवणी डोळ्यासमोर आल्या की काळजाला चिर पडतो..! कसं असतं ना आपल्या रोजच्या जीवनातल्या काही वस्तू, गोष्टींमध्ये आपला जीव, आपण स्वतः इतके गुंतून जातो ना की त्यांना वगळता आपण, आपलं आयुष्य किती अर्धवट आहे हे लगेच उमजून येतं, म्हणून चं हरवलेल्या गोष्टी सापडल्या की जीव सुखावतो आणि दुरावल्या की तुटतो..!
           - आदिती जाधव.



#bol_ratraniche #खिडकी #आठवणी #पाऊस #चंद्र #आयुष्य #नातं #ती_आणि_मी #मराठी #मराठीकविता #मराठीसाहित्य #मराठीलेख #blog #blogger #quarantinedays #quarantinediaries

बुधवार, १९ मे, २०२१

पाऊस तुझ्या आठवांचा...

चाहूल तुझी हळूच लागे म्हणे कोणी तरी
घन आज तुझ्या आठवणी बरसवणार आहे

थेंबा थेंबात तुझं असणं जाणवू लागेल मग 
मनात माझ्या ओसाड पाऊस थैमान घालेल

आज वीजा ही कडकडतील ढग ही निनादतील
तुझ्या आठवांचा पाऊस झिम्माड होऊन बरसून जाईल

क्षणात च, प्रत्येक थेंब खोलवर रुतून जाईल
शेवटी काय तर जखमा ओल्या होऊन रक्तबंबाळ मी होईन

तुझं असं असणं तुझ्या नसण्यापेक्षा जास्त त्रास देईल मग
हा पाऊस, कोरड्या मनावर आठवांचे सडे पसरून जाईल

तरीही तुझ्यात भिजण्याचा मोह माझ्याने आवरणार नाही
मनाचं असं कोरडं राहणं मला पुन्हा परवडणार नाही
                              - आदिती जाधव



#पाऊस #आठवणी #चाहूल #घन #जखम #मन #मराठी #मराठीकविता #मराठीसाहित्य #प्रेमकविता #मराठीलेख #bol_ratraniche #आदिती_सांगे

शनिवार, १५ मे, २०२१

गावाकडचा मोगरा..


      
         आज बाजारात मोगऱ्याची फुलं बघितली, तसं यात काही विशेष नाही माहितीय मला, पण तरीही आज त्या फुलांकडे पाहून मला फार विशेष वाटलं, ते ही अगदी सहजचं.... हो...! अगदी सहजचं..! ती मोगऱ्याची फुलं, त्यांचा तो मंत्रमुग्ध करणारा सुगंध जवळ येताना खूप साऱ्या आठवणी घेऊन आला आणि नेहमी प्रमाणे त्या आठवणी मला घेऊन गेल्या तिकडे, जिकडे मी माझं बालपण पुन्हा पुन्हा जगते, अगदी मनसोक्त. माझं गावचं घर..! त्या घराच्या पाठीमागे एक शेगलाचं आणि त्याच्याच कडेला आंब्याचं ही झाड आहे, या दोन झाडांना जोडणारी एक मोगऱ्याची वेल..!
     ती मोगऱ्याची वेल श्रावनमासात इतकी बहरून येते की शब्दांत मांडणं कठीण! तिची ती सफेद रंगाची फुलं, त्यांचा तो मनमोहक सुगंध... आ हा हा...! मी आणि माझे अंकल ( काका) रोज सकाळी सकाळी त्या वेलीवरची सगळी फुलं वेचायला जायचो. त्या वेलीवर इतकी फुलं यायची की आमच्या चार घरात मोठं वाडगं (भांडं) भरून फुलांचं वाटप व्हायचं. शाळेत मोगऱ्याच्या फुलांचा गजरा केसात माळून जाताना एक वेगळाचं उत्साह शरीरात संचारायचा. ह्या सगळ्या आठवणी एकदा का डोळ्यासमोर आल्या की डोळ्यात पाऊस दाटून आल्याशिवाय राहत नाही. 
     मी मुंबई ला आल्यापासून माझा पावसाळा इकडेच साजरा होतो. त्या मोगऱ्याच्या वेलीवर फुलं येतात की नाही माहीत नाही. मला खूप आठवण येते त्या मोगऱ्याच्या वेलीची तिला माझी आठवण येते की नाही माहीत नाही. अंकल ( काका) त्या वेलीवरची फुलं वेचायला जात असतील की नाही ते ही माहीत नाही. या सगळ्या प्रश्नांपलिकडे डोक्यात विचार मात्र वेगळाच आला. नाही म्हंटल तरी माणसाची, माणसाशी इतकी जवळीक नसावी कदाचित, जितकी जवळीक त्याची इतर बाबींशी असते. वस्तू-गोष्टी, फुलं-झाडं, पशु-पक्षी हे सगळे सजीव-निर्जीव माणसाला जगायला प्रेरित करतात, कारणाशिवाय हसायला, रडायला शिकवतात. निसर्गाकडे ही काय जादू आहे ना..., या सगळ्यांना माणसासारखं बोलता नाही आलं तरी भावनिकदृष्ट्या आपल्याला त्यांच्यासोबत , त्यांना आपल्यासोबत अगदी घट्ट जोडलं आहे, कधी ही न तुटण्यासाठी...!
                                  - आदिती जाधव.

रविवार, २ मे, २०२१

कोऱ्या कागदावरची ती कविता



              आपल्या प्रत्येकाच्या डायरीत अशी कविता नक्की असते जी आपल्या हृदयाच्या अगदी जवळ असते. तिचं आणि आपलं नातं कोणीही शब्दांत मांडेल इतकं सहज आणि सोपं अजिबातंच नसतं.. यात काही शंकाच नाही की आपण लिहिलेल्या सगळ्याच कविता आपल्या हृदयाशी अगदी चं जवळ असतात... पण ती एक कविता जी आपल्या डायरीच्या त्या कोऱ्या कागदावर लिहिली जाते, ज्या कोऱ्या कागदावर आपण कित्येक वर्षे पेनाचं टोक ही टेकवलेलं नसतं. तो कोरा कागद इतर कागदांसारखा सफेद नसतो, त्या कोऱ्या कागदावर चाफ्याचा रंग उतरलेला असतो, त्याचा गंध पानावर रेंगाळत असतो, बाजूला तो सुकलेला चाफा स्तब्ध असतो. कुणाची तरी आठवण स्वतःच्या पाकळ्यांमध्ये अलगद जपून ठेवून.
          कोऱ्या कागदावरची ती कविता डायरी चाळताना जेव्हा जेव्हा नजरेस पडते, तेव्हा तेव्हा तो चाफा सुगंधासवे मनाला भूतकाळात अलगत घेऊन जातो आणि मग तात्पर्य नसलेली ती गोष्ट पुन्हा काळजाच्या कोपऱ्यात असंख्य भावनांचे ढग गोळा करते. सुख-दुःखाचे ढग एकमेकांमध्ये कोण श्रेष्ठ यावर वाद घालू लागतात मग थोड्या च वेळात प्रेमाच्या सरी अचानक बरसू लागतात. त्या सरींच्या प्रत्येक थेंबात ते क्षण नव्याने फुलून येतात. त्याने दिलेला चाफा हाताच्या ओंजळीत आल्यापासून ते , तो डायरीतल्या पानात सुकून जाईपर्यंतचा सगळा प्रवास आपण क्षणभरात करून येतो. मग नयनातले अश्रू त्या कवितेवर पडू लागतात, ती कविता इंद्रधनुच्या रंगांनी रंगून गेलेली असते, शेवटी स्वतःच येऊन कानी गुणगुणू लागते...

                   ओंजळीतला माझ्या चाफा सुकुनी गेला...,
                    मज अजुनी वाटे तू येशील पुन्हा
                    ओंजळीत तुझ्या चाफा घेऊनी..
                     ओंजळीत तुझ्या चाफा घेऊनी..!

                                                        - आदिती जाधव.

नातं... कागदाचं कवितेशी...



           चार ओळींची कविता जेव्हा कोऱ्या कागदावर लिहिली जाते, तेव्हा त्यात फक्त शब्दांची जुळवा जुळव नसते. एका ओळीतल्या चार-पाच शब्दांत हजारो भाव-भावना लपलेल्या असतात. त्या कुणाला तरी कळतात तर काहींना भावतात, कोण तरी अनुभवतं तर कधी-कधी ती कविता निव्वळ वाचून सोडून देतं. काहींना पटतं काहींना नाही पण त्या कोऱ्या कागदाला मात्र अगदी मनापासून आनंद होत असतो. कवितेच्या चार ओळी कोऱ्या कागदाला नवीन ओळख देतात. त्यावर लिहिताना लेखक-लेखिका, कवी-कवयित्री खाडाखोड करून त्याला त्रास देतात ती गोष्ट वेगळी च म्हणा.
              एखादी कविता लिहिताना, कवी-कवयित्रींच त्या कवितेशी वेगळंच नातं निर्माण होतं. बऱ्याचदा ती कविता त्यांच्या आयुष्यातला एखादा किस्सा सांगत असते. त्या कवितेतला शब्दांशब्द कवियत्री ची भावना उस्फूर्तपणे व्यक्त करत असतो. पण, तुम्ही कधी विचार केलाय का...,  कवितेचं अन् कोऱ्या कागदाचं काय बरं नातं असेल ? आणि कसं असेल ? त्याचं नातं कुणाच्या नजरेस पडलं असेल का, पडलं असेल तर ते कुणाला उमजलं तरी असेल का ? कधी कोणी प्रयत्न तरी केला असेल का, त्यांचं नातं शब्दांत मांडण्याचा..? 
              'काही नाती शब्दांत मांडता येत नाहीत', हे अगदी खरंय..! तुम्ही ही सहमत असाल.... आहात ना सहमत..? हे ही नातं तसंच आहे. जेव्हा कवी-कवयित्रीं, कोऱ्या कागदावर कविता लिहितात तेव्हा तो कोरा कागद त्या कवितेला आपलंसं करून स्वतःमध्ये सामावून घेतो. मग त्या कागदाला त्या कवितेच्या नावाने ओळखलं जातं तर कधी कधी कवितेला त्या कागदावरून लक्षात ठेवली जाते. कागद आणि पेन नेहमी चं मित्र राहिले आहेत. पण कागद आणि कविता यांचं नातं इतकं अतुट आहे की, जरी हातात मोबाईल आला कविता, लेख त्यात type करून ठेवले तरी डायरीतल्या त्या कागदाशी कवितेचं नातं तुटनं अशक्यचं..! 
              - आदिती जाधव.

Featured Post

पत्रास कारण की...

प्रिय तू ,    आज खरंतर इतक्या वर्षात पहिल्यांदा तुला पत्र वगैरे लिहितेय, थोडं दिल खुलास होऊन सांगतेय. तुझी तक्रार असावी माझ्याकडून की, मी का...