पहिला पाऊस म्हंटल की, मातीचा सुगंध, झाडांच्या पानांवरचे पावसाचे थेंब, ओले रस्ते, ढगांचा गडगडाट, विजेचा कडकडाट सगळंच कसं डोळ्यासमोर येते ते ही आपोआप. त्या सरींच्या ओसाड पावसात तलप येते ती चहा ची मग तो चहा घेऊन 'ती'च्या जवळ उभं राहून ओसाड सरींचा तर कधी थेंबाथेंबांचा पाऊस अनुभवायचा, त्या क्षणी मनापासून जाणवतं की ह्या पेक्षा दुसरं सुख नाही. 'ती' पावसाच्या थेंबानी भिजलेली, थंडगार वाऱ्याने शहारून गेलेली त्यातल्यात्यात काही थेंब स्वतःजवळ जपून ठेवणारी अन् मला घरबसल्या पाऊस अनुभवून देणारी.. तसं ह्या 'ती' ची कल्पना थोडी निराळी आहे पण अगदी खरी खुरी..! आता प्रश्न असा की ती म्हणजे नक्की कोण ? तर ही 'ती' म्हणजे खिडकी ! जी मला घरबसल्या पावसाची मजा देते, रात्री चंद्र-चांदण्यांनी भिजवून टाकते आणि दिवसाढवळ्या त्या अवाढाव्य आभाळात सूर्य डोळ्यांसमोर असूनही आपल्यापासून किती लांब आहे याची जाणीव करून देते.
'ती' म्हणजे ही खिडकी मी राहत होती त्या वसई च्या घरातली, हिच्याविषयी सांगायचं झालं तर.. हिने मला असंख्य स्वप्नं, इच्छा आणि भरभरून प्रेम, आपलेपणा दिलाय. मी इथून चं जग बघितलं होतं, जे अस्पष्ट, अचाट आणि बऱ्यापैकी तुझं-माझं करणार होतं. या खिडकी ने मला अमाप अशा आठवणी दिल्यात ज्यात मी अजून ही वावरते, कधी कधी त्यात पुन्हा जगून घेते. तशी एक आठवण सांगायचं झालं तर कठीणचं आहे, हिने मला चंद्र दाखवलाय अवकाशातला ही आणि.. असो ! आम्ही मे महिन्यात गावावरून वसई ला रहायला आलो अन् पावसाने आमचं जोरदार स्वागत केलं होतं. बिल्डिंग मध्ये राहत असल्याकारणाने पावसात भिजायला जाणं जवळजवळ अशक्य त्याला कारण माझी आई. ताप, सर्दी, खोकला येईल म्हणून ती पावसात भिजायला तेव्हाही देत नव्हती आणि अजून ही देत नाही. तेव्हापासून मी 'ति'च्यासोबत अर्थात त्या खिडकी सोबत पाऊस अनुभवायला सुरुवात केली. पाऊस आणि वारा यांचं एकत्र आगमन झालं की पावसाचे थेंब चेहऱ्यावर यायचे अन् 'ति'ला मला दोघींना पावसाचा सोहळा अनुभवण्यास मिळायचा आणि आम्ही त्याचा भरभरून आनंद लुटायचो.
माझा वसईतला पहिला पाऊस अजून ही आठवतोय आणि पहिल्या पावसातली 'ती' सुद्धा.., त्यावेळी ती ओली चिंब होती, पावसाच्या थेंबानी छान सजली होती, गार वाऱ्याने किंचित शहारली देखील होती. 'ति'ला पाहून मला तेव्हा इतकं छान वाटलं होतं ना की मला आता शब्दांत मांडताना काय लिहू आणि किती लिहू असं होतंय. इतरांसाठी 'ती' फक्त खिडकी असली तरी माझ्यासाठी 'ती' माझी खूप जवळची मैत्रीण आहे, 'ति'ला माझी सगळी गुपितं ठाऊक आहेत. मी आता ज्या घरात राहते इथे ही खिडकी आहे परंतु त्या खिडकी ची गोष्ट थोडी निराळी आहे अगदी तिच्या अन् माझ्या नात्यासारखी..! आमचं नातं अतुट आणि निर्मळ होतं अजून ही आहे चं, तसं नातं या इकडच्या खिडकी सोबत होईल की नाही माहीत नाही. ते घर सोडून इकडे आल्यापासून 'ति'च्या सोबत जगलेला, अनुभवलेला एकूण एक क्षण आठवतो, पाऊस तर विसरता येणार च नाही..! ह्या आठवणी डोळ्यासमोर आल्या की काळजाला चिर पडतो..! कसं असतं ना आपल्या रोजच्या जीवनातल्या काही वस्तू, गोष्टींमध्ये आपला जीव, आपण स्वतः इतके गुंतून जातो ना की त्यांना वगळता आपण, आपलं आयुष्य किती अर्धवट आहे हे लगेच उमजून येतं, म्हणून चं हरवलेल्या गोष्टी सापडल्या की जीव सुखावतो आणि दुरावल्या की तुटतो..!
- आदिती जाधव.
#bol_ratraniche #खिडकी #आठवणी #पाऊस #चंद्र #आयुष्य #नातं #ती_आणि_मी #मराठी #मराठीकविता #मराठीसाहित्य #मराठीलेख #blog #blogger #quarantinedays #quarantinediaries
Kamal❤️
उत्तर द्याहटवा