आपल्या प्रत्येकाच्या डायरीत अशी कविता नक्की असते जी आपल्या हृदयाच्या अगदी जवळ असते. तिचं आणि आपलं नातं कोणीही शब्दांत मांडेल इतकं सहज आणि सोपं अजिबातंच नसतं.. यात काही शंकाच नाही की आपण लिहिलेल्या सगळ्याच कविता आपल्या हृदयाशी अगदी चं जवळ असतात... पण ती एक कविता जी आपल्या डायरीच्या त्या कोऱ्या कागदावर लिहिली जाते, ज्या कोऱ्या कागदावर आपण कित्येक वर्षे पेनाचं टोक ही टेकवलेलं नसतं. तो कोरा कागद इतर कागदांसारखा सफेद नसतो, त्या कोऱ्या कागदावर चाफ्याचा रंग उतरलेला असतो, त्याचा गंध पानावर रेंगाळत असतो, बाजूला तो सुकलेला चाफा स्तब्ध असतो. कुणाची तरी आठवण स्वतःच्या पाकळ्यांमध्ये अलगद जपून ठेवून.
कोऱ्या कागदावरची ती कविता डायरी चाळताना जेव्हा जेव्हा नजरेस पडते, तेव्हा तेव्हा तो चाफा सुगंधासवे मनाला भूतकाळात अलगत घेऊन जातो आणि मग तात्पर्य नसलेली ती गोष्ट पुन्हा काळजाच्या कोपऱ्यात असंख्य भावनांचे ढग गोळा करते. सुख-दुःखाचे ढग एकमेकांमध्ये कोण श्रेष्ठ यावर वाद घालू लागतात मग थोड्या च वेळात प्रेमाच्या सरी अचानक बरसू लागतात. त्या सरींच्या प्रत्येक थेंबात ते क्षण नव्याने फुलून येतात. त्याने दिलेला चाफा हाताच्या ओंजळीत आल्यापासून ते , तो डायरीतल्या पानात सुकून जाईपर्यंतचा सगळा प्रवास आपण क्षणभरात करून येतो. मग नयनातले अश्रू त्या कवितेवर पडू लागतात, ती कविता इंद्रधनुच्या रंगांनी रंगून गेलेली असते, शेवटी स्वतःच येऊन कानी गुणगुणू लागते...
ओंजळीतला माझ्या चाफा सुकुनी गेला...,
मज अजुनी वाटे तू येशील पुन्हा
ओंजळीत तुझ्या चाफा घेऊनी..
ओंजळीत तुझ्या चाफा घेऊनी..!
- आदिती जाधव.
मोजक्या शब्दात व्यक्त होतेस ही कला खूप छान आहे तुझ्याकडे
उत्तर द्याहटवा