शनिवार, १५ मे, २०२१

गावाकडचा मोगरा..


      
         आज बाजारात मोगऱ्याची फुलं बघितली, तसं यात काही विशेष नाही माहितीय मला, पण तरीही आज त्या फुलांकडे पाहून मला फार विशेष वाटलं, ते ही अगदी सहजचं.... हो...! अगदी सहजचं..! ती मोगऱ्याची फुलं, त्यांचा तो मंत्रमुग्ध करणारा सुगंध जवळ येताना खूप साऱ्या आठवणी घेऊन आला आणि नेहमी प्रमाणे त्या आठवणी मला घेऊन गेल्या तिकडे, जिकडे मी माझं बालपण पुन्हा पुन्हा जगते, अगदी मनसोक्त. माझं गावचं घर..! त्या घराच्या पाठीमागे एक शेगलाचं आणि त्याच्याच कडेला आंब्याचं ही झाड आहे, या दोन झाडांना जोडणारी एक मोगऱ्याची वेल..!
     ती मोगऱ्याची वेल श्रावनमासात इतकी बहरून येते की शब्दांत मांडणं कठीण! तिची ती सफेद रंगाची फुलं, त्यांचा तो मनमोहक सुगंध... आ हा हा...! मी आणि माझे अंकल ( काका) रोज सकाळी सकाळी त्या वेलीवरची सगळी फुलं वेचायला जायचो. त्या वेलीवर इतकी फुलं यायची की आमच्या चार घरात मोठं वाडगं (भांडं) भरून फुलांचं वाटप व्हायचं. शाळेत मोगऱ्याच्या फुलांचा गजरा केसात माळून जाताना एक वेगळाचं उत्साह शरीरात संचारायचा. ह्या सगळ्या आठवणी एकदा का डोळ्यासमोर आल्या की डोळ्यात पाऊस दाटून आल्याशिवाय राहत नाही. 
     मी मुंबई ला आल्यापासून माझा पावसाळा इकडेच साजरा होतो. त्या मोगऱ्याच्या वेलीवर फुलं येतात की नाही माहीत नाही. मला खूप आठवण येते त्या मोगऱ्याच्या वेलीची तिला माझी आठवण येते की नाही माहीत नाही. अंकल ( काका) त्या वेलीवरची फुलं वेचायला जात असतील की नाही ते ही माहीत नाही. या सगळ्या प्रश्नांपलिकडे डोक्यात विचार मात्र वेगळाच आला. नाही म्हंटल तरी माणसाची, माणसाशी इतकी जवळीक नसावी कदाचित, जितकी जवळीक त्याची इतर बाबींशी असते. वस्तू-गोष्टी, फुलं-झाडं, पशु-पक्षी हे सगळे सजीव-निर्जीव माणसाला जगायला प्रेरित करतात, कारणाशिवाय हसायला, रडायला शिकवतात. निसर्गाकडे ही काय जादू आहे ना..., या सगळ्यांना माणसासारखं बोलता नाही आलं तरी भावनिकदृष्ट्या आपल्याला त्यांच्यासोबत , त्यांना आपल्यासोबत अगदी घट्ट जोडलं आहे, कधी ही न तुटण्यासाठी...!
                                  - आदिती जाधव.

२ टिप्पण्या:

Featured Post

पत्रास कारण की...

प्रिय तू ,    आज खरंतर इतक्या वर्षात पहिल्यांदा तुला पत्र वगैरे लिहितेय, थोडं दिल खुलास होऊन सांगतेय. तुझी तक्रार असावी माझ्याकडून की, मी का...