शुक्रवार, २८ मे, २०२१

वादळ.. अंतरमनातलं

नैसर्गिक वादळ कुठे तरी जाऊन आदळतं आणि काही दिवसांच्या मुहूर्तावर थांबतं सुद्धा पण मनातल्या वादळाला ना आदळ-आपट करता येत ना कुठे थांबावसं वाटत. अनुमान लावायला गेलो तर इथे नक्की वादळाला सुरुवात कुठून झाली आणि का झाली याचं ठोस कारण सापडतं नाही. मग या वादळाचं काय करायचं असंच जाऊ दिलं तर आतल्या आत मनाला पार असून नसल्यासारखं करून टाकेल. आता नक्की काय करायचं..? कुणाला सांगायचं..? आणि मुळात ज्याला सांगू त्याला ते कळेल का...? पण सांगायचं म्हंटल तर मग नक्की काय आणि कसं सांगायचं..? या मनातल्या वादळाला शब्दांत मांडता येईल का..? ते कसं असतं काय असतं हे सांगता येईल का..? 
      काही भांवनाना शब्दांत मांडता येत नाही. हे मनातलं वादळ देखील असंच असतं याला शब्दांत मांडणं कठीण..! जर कुणी शब्दांत मांडलंच तर ते वाचणाऱ्याला किंव्हा ऐकणाऱ्याला समजेलच असं नाही. मग हे वादळ(मनातलं वादळ) नक्की काय असतं..? माझ्या मते तरी भावनांना भरती आल्यावर आपला त्यांच्यावरचा ताबा सुटतो; त्या भावना व्यक्त करायला जमतं नाही त्यावेळेस मनात जे राग, प्रेम,दया, क्षमा अशा अनेक भाव-भावनांचे जबरदस्त वारे वाहत असतात त्यांचं समिश्रकरण होऊन जी उरात आग लागते त्याला वादळ म्हणता येईल. हे वादळ कधी कधी आपल्या आत्मविश्वासाला तडा पाडून, आपल्याला दुःखी करून मनस्ताप देऊन, आपलं नुकसान ही करतं तर कधी कधी स्वतःवर विश्वास ठेवायला भाग पाडून, स्वावलंबी बनवून आपली प्रगती होण्यामागचं कारण ही ठरू शकतं. अर्थात आता ते आपल्यावर आहे अशा मनातील वादळांना कसे सामोरे जायचे त्याला कसे भिडायचे. वस्तुस्थिती बदलणं हे आपल्या हातात नसतं बऱ्याचदा पण; आपल्याला त्रास होणाऱ्या गोष्टींपासून आपण लांब रहायचं की त्यांनाचं आपल्या देखत, आपल्या आयुष्याची माती करू द्यायची हे ज्याचं त्याने ठरवावं नाही का..?

      सध्या कोरोनाच्या काळात टाळेबंदी असल्या कारणाने घरी बसून बसून अनेक विचार डोक्यात येतात  मग आपण आपण तर्क-वितर्क करू लागतो. बऱ्याचदा ह्या सगळ्यामुळे आपण योग्य निर्णय घेतो परंतु, काहिक वेळा ह्या सगळ्यामुळे आपणच अर्थातचे अनर्थ करतो अन् दुखावले तर जातोच सोबत आपल्या जवळच्या माणसांना सुद्धा दुखावतो. निर्णय हा ज्याचा त्याने घ्यावा आणि येणाऱ्या परिणामांना सामोरे जाण्याची हिम्मत सुद्धा ठेवावी. त्याचबरोबर ह्या सगळ्यात किती नुकसान होईल आणि कुणाचे होईल याची खबरदारी नक्कीच घ्यावी.

                                   - आदिती जाधव.

४ टिप्पण्या:

Featured Post

'सणासुदीचे दिवस'

मागची काही वर्षं दिवाळी वगैरे साजरी करत नव्हतो, ह्या वर्षीही नाही केली. घरासमोर दिवे, दाराला तोरण हीच काय ती दिवाळी. घरासमोर रांगोळी नाही, घ...