शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०२१

छत्रीतली मेनका । ( भाग १ )

सायंकाळची वेळ होती, निनाद एका झाडाखाली उभा होता. तेवढ्यात त्याला कुणाल चा कॉल आला. बरोबर दोन दिवसांआधी निनाद त्या झाडाजवळून सायकल घेऊन ठरलेल्या ठिकाणी त्याच्या मित्रांना भेटायला जात होता.., ओझरता पाऊस पडतं होता.., सायकल चालवता चालवता त्याच लक्ष रस्त्याच्या पलीकडे उभ्या असलेल्या एका मुलीकडे गेलं. तिचा चेहरा छत्री मुळे झाकला गेला होता पण निनाद मात्र सारखा तिला पाठी वळून वळून पाहत होता. जशी सायकल पुढे जाऊ लागली तशी ती नजरे आड झाली. निनाद त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी म्हणजेच रस्त्याच्या कडेला असलेली चहाची टपरी तिकडे जाऊन पोहचतो. सगळे मित्र मंडळी गप्पा टप्पा मारतात, एक - एक कप चहा घेऊन सायकल वरून मस्ती करत करत आपापल्या घरी जातात. 
      निनाद, तोरस्करांचा एकुलता एक मुलगा. त्याचे बाबा तालुक्यातल्या महाविद्यालयात प्राध्यापक आणि आई ग्रंथपाल, त्यामुळे निनाद ला अभ्यासाची, पुस्तकांची फार आवड. तसा जरा हट्टी पण समजूदार; मनाने निर्मळ पण थोडासा रागीट स्वभावाचा. रात्र झाली होती, घराच्या पाठी असलेल्या रातराणी चा सुगंध सगळीकडे पसरला होता. निनाद ओट्यावर गणितं सोडवत बसला होता, तेवढ्यात त्याला पटकन ती छत्री घेऊन उभी असलेली मुलगी आठवली..., कोण असेल ती ? त्याला प्रश्न पडला. क्षणभरात च "काय चाललंय माझं, गणितं सोडवायची बाजूला ठेवून तिचा विचार करत बसलोय'', असं म्हणून त्याने तेवढ्या पुरतं तिला टाळलं आणि गणितं सोडवायला सुरुवात केली. थोड्याच वेळात त्याच्या आई ने त्याला हाक मारली, ' निनाद.., जेवायला ये'. जेवता जेवता तोरस्करांच्या घरी नेहमी प्रमाणे गप्पा-गोष्टी झाल्या. शतपावली करायला निनाद बाहेर अंगणात गेला आणि कुणाल ला हाक मारली, कुणाल ने, ' आलो रे..' असा सूर लावत प्रतिउत्तर दिलं. कुणाल आणि निनाद शेजारी च राहत. कुणाल हा निनाद चा बालपणी चा अगदी जवळचा आणि खास मित्र. कुणाल येताच दोघांच्या गप्पा सुरु झाल्या आणि त्या गप्पांच्या मध्ये निनाद बोलता बोलता बोलून गेला, ' आज मी कट्टयावर येत होतो ना तेव्हा देवळाच्या माळावर एक मुलगी दिसली रे मला, हलका पाऊस पडत होता त्यात ही छत्री घेऊन उभी होती, त्यामुळे चेहरा काय दिसला नाही.' कुणाल हसत हसत निनाद ची थट्टा उडवू लागला आणि म्हणाला, '' गेल्या महिन्यात १७ वर्ष पूर्ण झाली आपल्याला, आता पर्यंत, 'तुला कोणत्या मुली चा चेहरा पाहायला नाही मिळाला', अशी तक्रार करताना कधी ऐकलं च नव्हतं. सगळं ठीक आहे ना भावा.'' असं म्हणून कुणाल हसू लागला. यावर काही च न म्हणता निनाद देखील हसू लागला. 
      सकाळ झाली, दुसरा दिवस उजाडला. सगळी पोरं महाविद्यालयात जाण्यासाठी बस स्थानकाजवळ उभी होती. बस आली, कुणाल आणि निनाद एकत्र च बसले होते, कुणाल ने अचानक त्या मुली चा विषय काढला तर निनाद, '' जाऊदेत असेल कोणी तरी,'' असं म्हणून दुर्लक्ष केलं. महाविद्यालयाच्या बस स्थानकाआधीच बस स्थानक आलं आणि गर्दी ओसरली; तेवढ्यात एक मुलगी बस मध्ये चढली. निनाद च अचानक लक्ष गेलं, त्याने तिला क्षणभर डोळ्यात टिपलं आणि स्वतःला च विचारू लागला..,' ही तीच आहे का, जी मला काल रस्त्याच्या पलीकडे दिसली होती..' निनादला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळे पर्यंत तिने त्याच्याकडे पाहिलं ! आणि मग काय तर, पहिल्यांदा दोघांची नजरेला नजर  भिडली..., तेवढ्यात गतिरोधकाने मध्ये च नाक खुपसलं आणि दोघे ही भानावर आले. निनादच्या डोक्यात राहून राहून एक च विचार घोळ घालत होता.., रस्त्याच्या पलीकडे पाहिलेली 'ती' आणि बस मधली 'ती' एकच की वेगवेगळ्या...?? बस थांबली महाविद्यालयाच बस स्थानक आलं, सगळी पोरं महाविद्यालयात गेली. वर्गात सगळे गप्पा टाकत बसले होते, निनाद मात्र एकटा बसून कसल्याशा विचारात मग्न होता. त्याच्या मित्रांनी त्याला विचारलं ही पण तो काही सांगेना. प्राध्यापक आले सगळी पोरं आपापल्या जागे वर जाऊन बसली. शिकवणी सुरू असताना कुणाल ने हळू च निनाद ला विचारलं, '' तू अजून ही तिचा च विचार करतो आहेस का..?'' निनाद ने काहीही न बोलता फक्त नाही अश्या अर्थाने मान डोलावली. पुढचा काही वेळ दोघांमध्ये शांततेत गेला. पहिला तास संपला आणि निनाद कुणाल ला तसाच बाहेर घेऊन आला. ''आज बस मध्ये एक मुलगी आलेली, आपल्या कॉलेज च्या आधी च्या बस स्थानक तिकडे ती बस मध्ये चढली; मी पाहिलं तिच्याकडे मला ती, त्या रस्त्यापलीकडच्या छत्रीतल्या मुली सारखी वाटली पण मी तिचा चेहरा पहिला च नव्हता.., मला नक्की माहीत नाही ती तीच आहे की अजून कोणी..'' निनाद ने कुणाल ला एका श्वासात सगळं कोडं सांगितलं. कुणाल त्याच्या कडे पाहतच राहिला.

*क्रमशः

                 - ©आदिती जाधव.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

पत्रास कारण की...

प्रिय तू ,    आज खरंतर इतक्या वर्षात पहिल्यांदा तुला पत्र वगैरे लिहितेय, थोडं दिल खुलास होऊन सांगतेय. तुझी तक्रार असावी माझ्याकडून की, मी का...