शनिवार, १८ सप्टेंबर, २०२१

छत्रीतली मेनका । ( भाग २ )

      बेल वाजली, दुसरा तास सुरू झाला. दोघे ही वर्गात गेले. दोघे ही गप्प, असेच पुढचे तास ही निघून गेले आणि मधली सुट्टी झाली. कुणाल, निनाद ला मैदानात घेऊन गेला. मग निनाद च म्हणाला, " काय झालंय माहीत नाही रे, पण ती जात च नाहीये डोक्यातून", कुणाल जास्त काही न बोलता त्याला फक्त इतकाच म्हणाला की, "अरे इतकं काही नाही, होतं असं कधी कधी जास्त विचार नको करुस. तू हुशार आहेस, ह्या सगळ्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष नको करुस.., हो ! माहिती आहे मला तू नाही करणार असं पण, मी सकाळ पासून पाहतोय तुला, तुझं लक्ष च नव्हतं वर्गात आणि राहिला प्रश्न 'ती' चा तर, आपण आज जाऊन पाहू ती माळावर दिसते का.., जर दिसली तर बघू, नाही दिसली तर त्याचा ही जास्त विचार नको करुस. चल, भूक लागली आहे मला. डब्यात आई ने तुझ्या आवडीची चण्याची भाजी दिली आहे मस्त चमचमीत ! चल खाऊ." असं म्हणून दोघे ही वर्गात गेले. तास संपले, महाविद्यालय सुटलं. ठरल्याप्रमाणे दोघे ही देवळाच्या माळावर गेले, "मला असं वाटतंय की, आपण नको यायला पाहिजे होतं इकडे, चल जाऊ परत," निनाद जरासा अस्वस्थ होऊन सांगू लागला. कुणाल ने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, " थांबू थोडा वेळ, पाहू येतेय का ती." खरं तर इतक्या वर्षात निनाद ला एका मुली साठी इतकं अस्वस्थ झालेलं कुणाल ने कधी पाहिलं च नव्हतं. 
      संध्याकाळ होतं आली होती. आभाळ रंग बदलू लागलं होतं, पण 'ती' छत्रीतली मेनका काही दिसेनाच. शेवटी मग नाही नाही म्हणता निनाद ने हट्ट च धरला घरी परत जायचा, कुणालकडे दुसरा पर्याय सुद्धा नव्हता. दोघे ही घरी जायला निघाले, जाता जाता न राहून कुणाल ने निनाद ला विचारलंच की, "तुझ्या डोक्यात नक्की काय सुरू आहे. ह्या वयात एखादी मुलगी आवडणं साहजिक आहे, इतका कसला विचार करतोयस..?" निनाद थांबला आणि म्हणू लागला, " हे सगळं साहजिक आहे मला ही समजतंय पण; ज्या मुलीचा चेहरा ही पहिला नाही मी, त्या मुलीचा इतका विचार का करतोय मी, ह्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाहीये रे ! आणि..., खरं तर तिचा विचार करण्यापासून मी स्वतःला थांबवू पाहतो पण नाही रे, जमत च नाही आहे, ती जातचं नाहीये डोक्यातून. पहिल्यांदाच होतंय असं, कळत नाहीये मला काय करू." निनादचा हा गोंधळ सोडवणं कुणाल ला काही जमत नव्हतं, दोघे ही शांत उभे होते. "चल जाऊ घरी, अभ्यास करायचा आहे." असं म्हणून निनाद घराच्या दिशेने चालू लागला, कुणाल ही त्याच्या सोबत च घरी गेला. रात्र गेली, सकाळ झाली. तास कमी असल्याकारणाने महाविद्यालय आज लवकर सुटलं. आज संध्याकाळी सगळ्यांनी चहाच्या टपरी वर भेटायचं ठरवलं. सगळे जमले पण निनाद काही दिसत नव्हता. मग कुणालने त्याला कॉल केला, त्यावेळी निनाद झाडाखाली उभा होता.
 निनाद ने कॉल उचलला, "हो, येतोय मी अर्ध्या रस्त्यात आलोय" असं म्हणून टपरीवर जाऊ लागला. समोरून त्याला सावनी ताई येताना दिसली, " काय रे.., आज एकटाच..? कुणाल आणि बाकी सगळे कधी चे थांबलेत तिकडे " असं विचारू लागली. " आज जरा उशीर झाला गं ताई, हे काय चाललोय आता " असं म्हणून तो पुढे जाऊ लागला. 
      'सावनी' ही कुणाल ची मोठी बहीण. निनाद देखील तिला कुणाल सारखा च होता. निनाद थांबला आणि पाठीमागे पाहून " ताई ऐक ना " असं सावनी ना म्हणाला. सावनी ने " बोल ना काय झालं ? " असं विचारलं. निनादला काय बोलावं सुचत नव्हतं मग तिने च विचारलं, "सगळं ठीक आहे ना ?." 'हो' अश्या अर्थाने मान डोलावून निनाद तिला सांगू लागला, " हो म्हणजे तसं सगळं च ठीक आहे पण, हल्ली थोडं विचित्र वाटतंय. अभ्यासात लक्ष लागत नाहीये, कळत नाहीये काय करू." सावनी त्याच्याकडे पाहून हसू लागली आणि म्हणाली, " कुणाल ने सांगितलं मला, तू अस्वस्थ झाला आहेस ते पण, कारण काही सांगितलं नाही." निनाद हसू लागला आणि म्हणाला, " इकडेच दोन दिवसांपूर्वी कोण तरी दिसली होती मला, छत्रीमुळे मला तिचा चेहरा दिसला नाही, पण तरीही तिचा विषय काही डोक्यातून जात नाही आहे माझ्या. तुला सांगू का.., खरं तर मुद्दा असा आहे की, हे सगळं असं का होतंय ह्याच उत्तर मिळत नाहीये मला त्याचा जास्त त्रास होतोय आणि मला स्वतःला थांबवता ही येत नाहीये तिचा विचार करण्यापासून." सावनी ने सगळं ऐकून घेतलं आणि म्हणाली, " निनाद रिलॅक्स ! ज्या वयात तुम्ही आता आहात, त्या वयात असं होणं खूपच साहजिक आहे, इतका त्रास नको करून घेऊस, ह्या पुढे ही अश्या खूप मुली दिसतील तुला, त्यांचे चेहरे ही दिसतील म्हणून तू प्रत्येकी साठी इतका अस्वस्थ होणार आहेस का..? आणि तिच्याविषयी सांगायचं झालं तर, तिने तुझं लक्ष का वेधून घेतलं तुझं तुला ठाऊक, तिच्या विषयी तुला काय वाटतं हे ही तुझं तुला च ठाऊक पण लक्षात घे अजून खूप लहान आहात तुम्ही, आता कुठे तुम्हाला जगण्याची खरी मजा कळेल. हळू हळू तरुण वयात प्रवेश कराल असे अनेक अनुभव येतील तुम्हाला, प्रत्येक गोष्टीसाठी डोक्याला इतका ताप नको देउस. आता तुझ्यासाठी काय महत्वाचं आहे ते बघ, त्याचा विचार कर, अजून खूप काही बाकी आहे, ये तो शुरुवात है..! बाकी आता काय करायचं, कुणाला महत्व द्यायचं आणि किती द्यायचं ते तुझं तू ठरव. जिंदगी में अभी बहुत आगे जाना है।" हे सगळं ऐकून निनाद चा गोंधळ जरासा दूर झाल्याचं दिसलं. " थँक्स ताई," असं म्हणून दोघे ही आपापल्या रस्त्याने निघाले.
      निनाद टपरीवर पोहचला. मित्रांच्या गप्पा झाल्या, सगळे घरी सुद्धा परतले, निनाद आणि कुणाल त्यांच्या अंगणातल्या, आंब्याच्या चौथऱ्यावर बसून गप्पा मारत होते. निनाद ला परत पूर्वीसारखं मोकळं आणि तणावमुक्त पाहून कुणाल ला छान वाटलं. " काय रे.., भेटली वाटतं तुला, तुझी 'छत्रीतली मेनका' नाही..! म्हणजे सकाळ पर्यंत जो ताण होता तुझ्या चेहऱ्यावर तो आता ओसरल्यासारखं वाटतंय म्हणून विचारलं." असं विचारत कुणाल ने निनाद ची थट्टा केली. त्याला प्रतिउत्तर देताना निनाद म्हणाला, " 'ती' नाही भेटली पण सावनी ताई भेटली, तिच्याशी बोललो तर आता जरा मोकळं वाटतंय." कुणाल ने विचारलं, "का ? असं काय बोलली ताई..?" निनाद उत्तरला, "जास्त काही नाही रे ! ह्या सगळ्याकडे पहायचा दृष्टीकोन बदलला माझा. आज दुपार पर्यंत 'ती कोण आहे' याचं उत्तर शोधत होतो, दुपार नंतर 'मी कोण आहे' याचं उत्तर शोधावसं वाटतंय, इतकंच !" एवढं बोलून दोघेही घरी गेले. त्या संध्याकाळ पासून निनाद चा प्रवास सुरु झाला.. ' मी कोण ' हे शोधण्याचा..
               
                     - ©आदिती जाधव.

२ टिप्पण्या:

Featured Post

पत्रास कारण की...

प्रिय तू ,    आज खरंतर इतक्या वर्षात पहिल्यांदा तुला पत्र वगैरे लिहितेय, थोडं दिल खुलास होऊन सांगतेय. तुझी तक्रार असावी माझ्याकडून की, मी का...