बुधवार, ८ सप्टेंबर, २०२१

भाग्यवंत आम्ही रुपारेल चे !

        आज माझ्या डिग्री कॉलेज चा पहिला दिवस होता. साहजिक च, आवडत्या कॉलेजमध्ये, आवडते विषय म्हंटल्यावर पहिला दिवस छान च जाणार आणि गेला सुद्धा. काल च ओरिएंटेशन झालं. डिग्री कॉलेजमध्ये पुढील तीन वर्ष काय अभ्यासक्रम असेल, परीक्षा कश्याप्रकारे होतील आणि कोणते कोणते उपक्रम असतात, ते कश्याप्रकारे पार पडतात. अश्या सगळ्याच गोष्टींबद्दल थोडी थोडी माहिती दिली. एकंदरीत डिग्री कॉलेज ची थोडक्यात ओळख करून दिली. अर्थात सध्याच्या परिस्थितीत सगळं च ऑनलाईन सुरू आहे, त्यात आमचं कॉलेज ही आलंच ते ही ऑनलाईन च ! मुंबई मधलं डी. जी. रुपारेल कॉलेज ( D. G. RUPAREL COLLEGE OF THE ARTS, SCIENCE AND COMMERCE ) मी माझं ज्युनिअर कॉलेज इथे च पूर्ण केलं. आता डिग्री कॉलेज सुद्धा इथेच. म्हणा इतकी भव्य आणि सुंदर वास्तू कोणाला सोडून जाविशी वाटेल. डी. जी. रुपारेल कॉलेज, मी ज्युनिअर कॉलेजच्या ऍडमिशनसाठी पहिल्यांदा या वास्तूत पाऊल टाकलं होतं. त्यावेळेस मला समजलंच नाही मी कुठून आत आली आणि कुठून बाहेर पडली. खरं तर तेव्हा मी फ्रंट गेट ( माटुंगा रोड स्टेशनच्या बाहेर चा गेट ) मधून आत आली आणि बॅक गेट ( दादर जवळचा गेट ) मधून बाहेर पडली पण; हे मला कॉलेज सुरू झाल्यानंतर माहीत पडलं. 
           कॉलेज सुरू झालं, मग हळू हळू कॉलेज ची ओळख झाली, नवनवीन मित्र-मैत्रिणींशी ओळख झाली. कॉलेजमधले कट्टे, रुपांगण सगळंच ओळखीचं आणि जवळच झालं. कॅन्टीन, कॅम्पस, आर्टस् बिल्डिंग, सायन्स बिल्डिंग, सगळंच खूप खूप भारी वाटलं होतं आता ही वाटतं. आमचं कॉलेज सुरू झालं आणि ८ महिन्यांनी लॉक डाउन पडलं पण, या आठ महिन्यांत कॉलेज चा इतका लळा लागला की, पुन्हा कधी रुपारेल मध्ये जातोय असं वाटत होतं. तसं कॉलेजच्या कामासाठी १ - २ वेळा जाणं झालं होतं पण तात्पुरतं च ! लगेच जाऊन लगेच घरी आलो. जेव्हा कॉलेज नियमितपणे सुरू होतं, तेव्हा आल्यावर आधी १२ आर्टस् मध्ये जाऊन डबा खायचा मग लेक्चर ला बसायचो, त्यांनतर मधल्या सुट्टीत कॅम्पसमध्ये फिरायचो, कॅन्टीनमध्ये जाऊन तिकडचे पदार्थ खायचो, खूप फोटोस् काढायचो आणि मग कॉलेज सुटलं की ट्रेन साठी धावत पळत सुटायचो. लेकचर्स ऑफ असले की कॅम्पसमध्ये बसून मित्र-मैत्रिणींशी गप्पा टाकायच्या. कधी कधी स्टडी रूम मध्ये जाऊन अभ्यास करायचा, तसं तिथे अभ्यास कमी पण गप्पा जास्त रंगायच्या. रुपारेल मधलं वातावरण इतकं छान आहे की, अभ्यास करताना मन शांत आणि प्रसन्न राहतं. कधी कधी तर लेकचर्स नसले तरी कॉलेजमध्ये जायचो. या वास्तू सोबत, इथल्या लहान सहान प्रत्येक गोष्टी सोबत एक वेगळंच नातं तयार झालंय. जे आम्हाला कायम भावनिकदृष्ट्या एकमेकांशी जोडून ठेवतं.खरं तर या लॉक डाउन मुळे सगळं च ऑनलाईन सुरू आहे. त्यामुळे आता डिग्री कॉलेज सुद्धा ऑनलाईनच. घरी बसून लेकचर्स अटेंड करायला जरासा कंटाळा येतोच, जर आता कॉलेज सुरू असतं तर किती मज्जा आली असती. 
           सकाळी रुपारेल खूप सुंदर आणि मनमोहक दिसतं. लॉक डाउन नसतं तर ते दृश्य रोज पहायला आणि अनुभवायला मिळालं असतं. सकाळसकाळी पारिजातकाचा सुगंध चोहिकडे दरवळतो आणि त्याचा तो सडा इतका आकर्षक आणि सुंदर दिसतो की अक्षरशः डोळे तृप्त होतात. जर एका वास्तूमुळे दिवसाची सुरुवात इतकी सुंदर आणि छान होणार असेल तर ती वास्तू कोणाला नाही आवडणार.. खरंच भाग्यवंत आम्ही रुपारेल चे ! रुपारेल ची खरंच खूप आठवण येतेय..., जावसं वाटतंय त्या वास्तूत, ती नयनरम्य सकाळ, तो मंत्रमुग्ध करणारा परिजातकाचा सुगंध सगळं च पहावंस अन् अनुभवावंस वाटतंय. लॉक डाउन कधी संपतोय आणि आम्ही कधी रुपारेल मध्ये जातोय असं झालंय.. आम्ही नाही आहोत तिकडे तर सगळीकडे खूप शांतता पसरली असावी, कदाचित रुपारेल ला ही ती शांतता असह्य होतं असेल... त्याला ही आमची आठवण येत असावी... येत असेल ना त्याला ही आमची आठवण...?

                                 - आदिती जाधव.

२ टिप्पण्या:

Featured Post

'सणासुदीचे दिवस'

मागची काही वर्षं दिवाळी वगैरे साजरी करत नव्हतो, ह्या वर्षीही नाही केली. घरासमोर दिवे, दाराला तोरण हीच काय ती दिवाळी. घरासमोर रांगोळी नाही, घ...